शिंदेंना पाठविलेल्या ई-मेलवरून दोन्ही गटांत खडाजंगी | पुढारी

शिंदेंना पाठविलेल्या ई-मेलवरून दोन्ही गटांत खडाजंगी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील शुक्रवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पक्ष बैठकीसाठी एकनाथ शिंदे यांना पाठविलेला ई-मेल बनावट असल्याचा दावा करतानाच घटनादुरुस्तीचे पत्रही बनावट असल्याचा दावा करत शिंदे गटाने चौकशीची मागणी केली. तर, केवळ प्रसिद्धीसाठी बनावट ई-मेल आयडीचा आरोप केला जात आहे. सत्यता तपासायची असेल तर मग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना साक्षीला बोलावण्याची मागणी ठाकरे गटाने केली. त्यावर साक्ष, चौकशीसाठी असे अर्ज येऊ लागले तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेत निर्णय देणे कठीण जाईल, अशी हतबलता विधानसभा अध्यक्षांनी मांडली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. 2018 साली घटनादुरुस्ती झाली नसल्याचा आणि त्याबाबतची पत्रे बनावट असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यावर याची सत्यता तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनाच समन्स पाठवून साक्षीसाठी बोलावण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. त्यासाठीचे पत्रच त्यांनी सकाळच्या सत्रात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे सादर केले. पक्षाच्या घटना दुरुस्तीबाबत जे पत्र निवडणूक आयोगाला पाठविल्याचे सांगितले जात आहे, त्या पत्राची मूळ पोचपावती नाही.

अनिल देसाई यांनी आयोगाला पाठविलेले पत्रही कुठेच सादर करण्यात आले नाही. रेकॉर्डवरही काही नाही. या सगळ्यात सुनील प्रभू यांना बकरा बनवले जात असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. बकरा या शब्दावर ठाकरे गटाचे वकील कामत यांनी आक्षेप घेतला. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना बोलवून त्यांच्याकडे हे पत्र आहे की नाही, हे ठरवावे लागेल. त्यासाठीच त्यांना बोलावण्याची विनंती आम्ही करतोय, अशी भूमिका कामत यांनी मांडली. त्यावर आयोगाच्या अधिकार्‍यांना समन्स पाठविणे किंवा नवीन अर्ज स्वीकारणे यात वेळ जाईल. दिलेल्या वेळेत सुनावणी पार पाडणे शक्य होणार नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मांडली.

दरम्यान, जेवणाच्या सुट्टीनंतरच्या सत्रात सुनावणीला सुरुवात होताच ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक अधिकार्‍यांना समन्स पाठविण्याबाबत आग्रह धरणार नसल्याचे सांगितले. केवळ रेकॉर्डसाठी याबाबतचा अर्ज रेकॉर्डवर दाखल करत असल्याचेही कामत यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या बैठकीबाबत ई-मेलवर पाठविलेल्याची साक्ष प्रभू यांनी सुनावणीत दिली होती. विधिमंडळाच्या पुस्तिकेतून हा ई-मेल पाठविण्यात आल्याचे सांगत त्याची प्रतही सादर केली. मात्र प्रभू यांनी बनावट ई-मेल येथे सादर केला आहे.

काल 29 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांचा बनावट ई-मेल तयार करण्यात आल्याचा दावाही जेठमलानी यांनी यावेळी केला. त्यावर हे खोटे असल्याचे प्रभू यांनी सांगितले. मात्र बनावट ई-मेलचा मुद्दा जेठमलानी यांनी लावून धरला. त्यावर कामत यांनी हरकत घेत ठाकरे गटाची बाजू मांडली. शिंदे गटाकडून केला जाणारा युक्तिवाद हा वेळकाढूपणा आणि प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्ट बनावट असल्याचे सांगितले जात आहे. त्या ई-मेलची तज्ज्ञांकडून खातरजमा करून घेता येईल. शिवाय तो ई-मेल ज्यांनी पाठवला त्यांना सुनावणीत बोलवा आणि विधानसभा अध्यक्षांसमोरच तो ई-मेल उघडून शहानिशा करा. आम्ही तो ई-मेल पाठविल्याचे सिद्ध करू शकतो, असे देवदत्त कामत म्हणाले. शिवाय अपात्रतेची याचिकाही शिंदे यांना त्याच ई-मेलवर पाठवण्यात आल्याचेही कामत म्हणाले.

नार्वेकरांनी वातावरण केले शांत

दोन्ही गटाच्या वकिलांची खडाजंगी आणि आक्रमक पवित्रा पाहून राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

वेळेच निर्बंध पाळणे शक्य होणार नाही : नार्वेकर

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या तयारीच्या बैठकाही मी ऑनलाईन घेतल्या. राज्यात अवकाळी पावसाचा मुद्दा आहे, शेतकर्‍यांचे प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. हे सर्व कामकाज असतानाही आपण नियमित सुनावणीला प्राधान्य देत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत आपण कामकाज ठरविले आहे. ते 26 पर्यंत नेणे अशक्य आहे. ठरलेल्या याचिकांव्यतिरिक्त कोणतीही याचिका दाखल करून घेतल्यास वेळेचे निर्बंध पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुनावणी पार पडूद्या, असे नार्वेकर म्हणाले.

Back to top button