Timed Out Controversy : ‘टाइम आऊट’वरुन वादाचा धुरळा : शाकिबची ‘लढाई’ची भाषा, मॅथ्यूजने काढली ‘पातळी’ | पुढारी

Timed Out Controversy : 'टाइम आऊट'वरुन वादाचा धुरळा : शाकिबची 'लढाई'ची भाषा, मॅथ्यूजने काढली 'पातळी'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि.६) बांगला देश  विरुद्ध  श्रीलंका सामन्‍यात श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला ‘टाईम आऊट’ ठरविण्‍यात आले.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज टाईम आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. ( Timed Out Controversy ) या निर्णयावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. या वादावरुन बांगला देश आणि श्रीलंका खेळाडूंमध्‍ये वाकयुद्धाचा भडका उडाला आहे.

सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशी खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नाही. सामन्यादरम्यान मैदानात झालेल्या भांडणानंतर आता अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यात मैदानाबाहेरही वाकयुद्ध रंगले. या दोघांनीही पत्रकार परिषदेत टाइम आऊटबाबत वक्तव्ये केली आहेत. त्यांनीही एकमेकांवर निशाणा साधला आहे.

Timed Out Controversy :  सामन्यानंतर शाकिब काय म्हणाला?

सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब म्हणाला- माझ्या ‘टाइम आऊट’ अपीलावर मला कोणताही पश्चाताप नाही. मी जे काही केले ते मी नियमांच्या मर्यादेत केले. मॅथ्यूजने दोन मिनिटे घेतली होती. माझ्या एका सहकाऱ्याने मला सांगितले की यास वेळ लागत आहे. आम्ही पंचांकडे वेळ मागू शकतो. यानंतर मी पंचांकडे दाद मागितली. मी मॅथ्यूजला 2006 पासून ओळखतो. अंडर-19 वर्ल्डकपपासून आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. अपील केल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी अपील मागे घेत आहात का, असे विचारले असता, मी ते मागे घेण्यास नकार दिला. मी पंचाकडे गेलो आणि त्याला आऊट द्यायला सांगितले; मग पंचांनी विचारले की तुम्हाला हे नक्की करायचे आहे का, अशी विचारणा मला पंचांनी केली. मी म्हणालो की, जर हे नियमात असेल तर त्याला आऊट द्या. आम्ही लढाईत आहोत आणि आमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेन. हे योग्य की अयोग्य यावर नेहमीच चर्चा होईल, पण मी तेच केले जे नियमात होते.

शाकिब आणि बांगलादेशचा आदर करू शकणार नाही : अँजेलो मॅथ्यूज

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मॅथ्यूज म्हणाला की, “मी काहीही चुकीचे केले नाही. माझ्या हेल्मेटची पट्टी तुटली तेव्हा दोन मिनिटं व्हायला अजून पाच सेकंद बाकी होते. हे संपूर्णपणे अचानक उपकरणे निकामी झाल्याची घटना होती. माझ्याकडे व्हिडिओ पुरावा आहे. शाकिब आणि बांगलादेशने माझ्‍याबाबत घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा होता. तसेच खेळाच्या प्रतिमेच्या विरुद्ध आहे. यापुढे मी शाकिब आणि बांगला देशचा आदर करू शकणार नाही. पंचांनीही याकडे लक्ष द्यायला हवे होते. एकीकडे क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची चर्चा आहे. माझे हेल्मेट खराब झाले असेल तर मी गोलंदाजासमोर हेल्मेटशिवाय कसे खेळू शकेन, असा सवाल करत शाकिबने आज खेळाची बदनामी केली आहे. माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत खेळाची एवढी प्रतिमा मलिन करणारी खालच्‍या पातळीची घटना कधी घडली नाही.

Timed Out Controversy : ‘टाइम आऊट’वर माजी क्रिकेटपटू काय म्‍हणाले?

माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूसने शाकिबचे आवाहन खेळाच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहलं आहे की, ‘दिल्लीमध्ये जे घडले ते खूपच निराशाजनक आहे.’
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने मॅथ्यूजच्या टाइमआऊटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्‍याने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहलं आहे की, ‘मॅथ्यूजला वेळ कसा देता येईल, जेव्हा तो क्रीजवर होता आणि त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता. हा टाईम आउट कसा झाला? जर तो क्रीझवर आला नसता तर मी टाईम आऊटच्या बाजूने होतो; पण हे चुकीचे आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले आहे की, ‘हेल्मेटच्या समस्येसाठी वेळ संपला… क्रिकेट विश्वचषकात हे नवीन आहे.’ माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने लिहिले – शाकिबने विजयावर विश्वास ठेवला पाहिजे, परंतु कोणत्याही किंमतीवर नाही… ही घटना लज्जास्पद आहे.

Timed Out Controversy :श्रीलंका-बांगलादेश सामन्‍यात नेमके काय घडले होते?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने 24.2 व्या षटकात चौथी विकेट गमावली. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने सदीरा समरविक्रमाला बाद केले. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. क्रिजवर पोहचून तो बॅटींगसाठी स्टान्स घेणार तोच त्याच्या लक्षात आले की, आपल्या हेल्मेटचा बेल्ट खराब झाला आहे. हे पाहून त्याने हेल्मेट काढले आणि ड्रेसिंग रुमकडे पाहत राखीव खेळाडूकडे नव्या हेल्मेटची मागणी केली. त्यावेळी तो क्रिजच्या बीहेर बराच उशीरा थांबला. त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने पंचांकडे अपील केले. दरम्यान, मॅथ्यूजला नवे हेल्मेट मिळाले. तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणार तोच त्याला पंचांनी पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. हे पाहून मॅथ्यूजला आश्चर्य वाटले. जेव्हा त्याने पंचांना कारण विचारले तेव्हा त्याला कळले की त्याला क्रीजवर यायला खूप उशीर झाला होता आणि तो टाइमआउट झाला आहे. यानंतर मॅथ्यूज आणि पंचांमध्ये जोरदार वादावादी झाली. मॅथ्यूज विरोधी संघाचा कर्णधार शकिब अल हसनशीही बोलला, पण शाकिबही आपले अपील मागे घेण्यास तयार नव्हता. अशा स्थितीत मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. मॅथ्यूज रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. त्याने हेल्मेट आणि बॅट फेकून दिली. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडही या संपूर्ण घटनेने चांगलेच संतापलेले दिसले. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोघांसोबत चौथे पंचही उपस्थित होते. पण फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने हथुरुसिंहाच्या हातात काहीच नव्हते.

‘टाइम आउट’चा नियम काय आहे?

40.1.1 नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही तर त्याला बाद घोषित केले जाते. याला ‘टाइम आउट’ म्हणतात. तर 40.1.2 नियमानुसार, निर्धारित वेळेत (3 मिनिटे) नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला नाही, तर मैदानी पंच नियम 16.3 ची प्रक्रिया पूर्ण करतील आणि फलंदाजाला ‘टाइम आऊट’ घोषित करतील.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 फलंदाज झाले आहेत ‘टाइम आऊट’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टाइम आऊट’ होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. पण याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असे घडले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 फलंदाज ‘टाइम आऊट’चे बळी ठरले आहेत.

प्रथम श्रेणीत ‘टाइम आऊट’ झालेले फलंदाज :

  • अँड्र्यू जॉर्डन : (पूर्व प्रांत विरुद्ध ट्रान्सवाल, पोर्ट एलिझाबेथ 1987-88)
  • हेमुलाल यादव (त्रिपुरा विरुद्ध ओडिशा, कटक 1997)
  • व्हीसी ड्रॅक्स (बॉर्डर विरुद्ध फ्री स्टेट, ईस्ट लंडन 2002)
  • एजे हॅरिस (नॉटिंगहॅमशायर विरुद्ध डरहम, नॉटिंगहॅम 2003)
  • रायन ऑस्टिन (विंडवर्ड आयलंड विरुद्ध कम्बाइंड कॅम्पस अँड कॉलेज, सेंट व्हिन्सेंट 2013-14)
  • चार्ल्स कुंझे (मॅटाबेलँड टस्कर्स विरुद्ध माउंटेनियर्स, बुलावायो 2017)

 

Back to top button