World Cup 2023 : पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये फायरिंग करत जल्लोष | पुढारी

World Cup 2023 : पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये फायरिंग करत जल्लोष

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दशकांपासून संकटांशी झुंजणाऱ्या अफगाणिस्तानच्या नागरिकांना आनंदाची संधी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने दिली आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सोमवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या : 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक दशकांपासून वादग्रस्त आहेत आणि क्रिकेट सामन्यांमध्येही त्यांच्यातील वैर दिसून येते. सोमवारी पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. झद्रानने ८७ धावांची शानदार खेळी केली होती. जेव्हा झद्रान सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो कोणाला समर्पित करणार आहे. ज्यावर त्याने सांगितले की. ही ट्रॉफी त्या अफगाण नागरिकांसाठी आहे ज्यांना पाकिस्तानातून जबरदस्तीने बाहेर काढले जात आहे. पाकिस्तान सरकारने सुमारे १७ लाख अफगाण निर्वासितांना १ नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या या निर्णयावर टीका करत हा निर्णय अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये फायरिंग करत जल्लोष

पाकिस्तानवरील विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हबीब खान या अफगाणिस्तानमधील एका पत्रकाराने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हबीब खानने लिहिले आहे की, “हे फ्रंटलाइन वॉर झोन नाही तर काबूलमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरचा जल्लोष आहे.” हबीब खानने विजय साजरा करताना अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानच्या विविध भागात लोक जल्लोष करताना दिसतात.
अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान आणि माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाण स्टेडियममध्ये डान्स करतानाचा फोटोही हबीबने शेअर केला आहे. “भारतातील एक पठाण अफगाणिस्तानच्या पठाणसोबत पाकिस्तानवर मिळवलेला विजय साजरा करत आहे. संपूर्ण स्पर्धेत अफगाणिस्तानला साथ दिल्याबद्दल भारताचे खूप खूप आभार,” असे कॅप्शमध्ये लिहीले आहे.

तालिबान काय म्हणाले?

काबूल पोलिसांचे प्रवक्ते आणि तालिबानशी संलग्न खालिद जद्रान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आमच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. आम्ही असा विजय मिळवला आहे, जो अशक्य असल्याचे अनेकांनी सांगितले होते. अफगाणिस्तानचा हा विजय काही लोकांसाठी खास संदेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाच्या चीफ ऑफ स्टाफच्या एक्स खात्यावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. “अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयाबद्दल राष्ट्रीय क्रिकेट संघ, क्रिकेट बोर्ड आणि सर्व अफगाण नागरिकांचे अभिनंदन,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही पाकिस्तानवर विजय मिळवल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे. अफगाणिस्तानचे भारताचे राजदूत फरीद मामुंदझाई यांनी या विजयाबद्दल अफगाणिस्तानचे अभिनंदन केले आहे. “आव्हानात्मक काळात या विजयाने आपल्या देशाला आवश्यक असलेला आनंद दिला आहे. खेळ आपल्याला एकत्र आणतात आणि हसवतात. प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या भारतीय समर्थकांचे आभार,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीतील अफगाणिस्तानचा दूतावास सध्या बंद आहे असून तालिबान सरकारने फरीद मामुंदझाई यांना राजदूत म्हणून स्वीकारलेले नाही.

हेही वाचा : 

Back to top button