पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकातील (World Cup 2023) सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात भारताने शनिवारी (१४) पाकिस्तानचा ७ विकेटस् आणि तब्बल ११७ चेंडू राखून दारुण पराभव केला. तमाम देशवासीयांना अपेक्षित असलेली झुंझार खेळी करीत टीम इंडियाने नवरात्रौत्सवाच्या पूर्वरात्रीला घटस्थापना केली. भारताने पाकिस्तानला धूळ चारत विश्वचषक स्पर्धेत सलग आठव्यांदा पराभूत केल्याचा एक आगळा विक्रम या विजयाने केला. पाकिस्तानकडून मात्र भारताने हा सामना काळी जादू करून जिंकला असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर आणि पत्रकार हरीम शाहकडून वादग्रस्त दावा करण्यात आला आहे. भारताला विजय निष्पक्ष खेळाने प्राप्त झाला नाही तर तो काळ्या जादूचा परिणाम आहे. ही काळी जादू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली आहे, असा आरोप तिने केला आहे. (World Cup 2023)
संबंधित बातम्या :
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली होती, तेव्हा पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत पुढे जात होता. यानंतर बाबर बाद होताच पुढच्या ३६ धावांत त्याची संपूर्ण फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हे सर्व भारतीय गोलंदाजांचे कौशल्य आणि त्यांचा सर्वोत्तम खेळ यामुळे नाही, तर इथे काळी जादू केल्याने घडले, असे हरीमने म्हटले आहे. (World Cup 2023)
हरीम शाह हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका मांत्रिकाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "विश्वसनीय सूत्रांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी निकालावर प्रभाव टाकण्यासाठी काळी जादू केली. यासाठी त्यांनी कार्तिक चक्रवर्ती नावाच्या मांत्रिकाची मदत घेतली होती. आयसीसीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तिने केली आहे.
अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारताने वर्ल्डकप २०२३ च्या तिसर्या सामन्यात पाकिस्तानचा डाव १९१ धावांत संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली. भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेत पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५०, तर मोहम्मद रिझवानने ४९ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करीत भारताचे टेन्शन वाढविले होते. मात्र मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानची मधील फळी उडवली. त्यानंतर पंड्या आणि जडेजाने शेपूट गुंडाळत पाकचा डाव ४३ षटकांत संपवला. पाकिस्तानचे १९२ धावांचे आव्हान पार करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत ८६ धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा :