Virat-Babar : बाबरने घेतली विराटची जर्सी! पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना मिर्ची झोंबली(Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat-Babar : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (दि. 14) भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, यावेळीही निकाल काही वेगळा लागला नाही. गेल्या आठ वर्ल्डकपमध्ये जे होत आले तेच घडले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुन्हा एकदा विश्वचषकात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारून विजयाअष्टमी साजरी केली.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ 42.4 षटकांत 191 धावांवर गारद झाला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावून धावा केल्या आणि विश्वचषकातील सलग तिस-या विजयाची नोंद केली. हा सामना जिंकताच टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहचली आहे.
दरम्यान, हा सामना संपल्यानंतर मैदानात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आपली 18 क्रमांकाची जर्सी भेट देऊन उपस्थित चाहत्यांची मने जिंकली. विराटच्या या स्टाइलला क्रिकेट चाहत्यांचा पाठिंबा मिळाला. या मैत्रीपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द आयसीसीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकौंटवरून शेअर केला आहे. पण ही घटना पाकच्या माजी क्रिकेटपटूंना झोंबली असून त्यांनी आपल्याच खेळाडूवर टीकेची झोड उठवली आहे.
मात्र, बाबर आझमच्या या कृतीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने टीका केली आहे. तो म्हणाला, 'सामन्यानंतर असे कृत्य करणे चूकीचे आहे. कोहलीला भेटण्याची ही योग्य वेळ नव्हती. हा दिवस त्यासाठी योग्य नव्हता. बाबरने मोकळ्या मैदानात कोहलीकडून टी-शर्ट घेणे हा पाकिस्तानी चाहत्यांचा अपमान आहे. त्याने हे कृत्य खाजगीत करायला हवे होते,' असा टोला त्याने लगावला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ 42.5 षटकात 191 धावांवर गारद झाला. बाबर आझम (50 धावा), मोहम्मद रिझवान (49) आणि इमाम उल हक (36) वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. पाकिस्तानने शेवटच्या आठ विकेट 36 धावांत गमावल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (53) यांच्या खेळीच्या जोरावर 30.3 षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. अशाप्रकारे, भारतीय विजयात गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.