अहमदाबाद : विश्वचषकातील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेटस् आणि तब्बल 117 चेंडू राखून दारुण पराभव केला. तमाम देशवासीयांना अपेक्षित असलेली झुंझार खेळी करीत टीम इंडियाच्या वाघांनी नवरात्रौत्सवाच्या पूर्वरात्रीला भारताच्या विजयाची जणू घटस्थापना केली. भारताने पाकिस्तानला धूळ चारत विश्वचषक स्पर्धेत सलग आठव्यांदा पराभूत केल्याचा एक आगळा विक्रम या विजयाने केला आहे. वेगवान गोलंदाज बुमराह विजयाचा शिल्पकार ठरला.
यंदा वर्ल्डकपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारताने वर्ल्डकप 2023 च्या तिसर्या सामन्यात पाकिस्तानचा डाव 191 धावांत संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली. भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेत पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50, तर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करीत भारताचे टेन्शन वाढविले होते. मात्र मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानची मधील फळी उडवली. त्यानंतर पंड्या आणि जडेजाने शेपूट गुंडाळत पाकचा डाव 43 षटकांत संपवला. संबंधित वृत्त/स्पोर्टस्