नवरात्राआधीच दसरा-दिवाळी | पुढारी

नवरात्राआधीच दसरा-दिवाळी

विश्वचषकाच्या रणभूमीतून : निमिष पाटगावकर

भारतीय संघाने अहमदाबादला कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्ती करत विजयाचे घट निळ्या महासागराच्या साक्षीने बसवले. खरे तर नवरात्राआधीच भारतीयांची दसरा-दिवाळी शनिवारी साजरी झाली. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकाच्या रेकॉर्डला धक्का सोडाच, जवळपास जाण्याइतकाही पाकिस्तानचा संघ तग धरू शकला नाही. रोहित शर्माच्या आक्रमणात पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडाल्या. जणू काही पूर्वीचा कसला तरी हिशेब चुकवाaयच्या थाटात कर्णधाराची खेळी रोहित शर्मा खेळला. आश्विन महिन्यात नवरात्राच्या पूर्वसंध्येला त्याने आषाढ सरींसारखी धो-धो फटकेबाजी करत अहमदाबादचे मैदान शुचिर्भूत केले. आषाढ सरी या पर्जन्यमानात मोजायच्या नसतात, तर खिडकीत बसून त्यांचा आनंद घ्यायचा असतो. रोहित शर्माची फलंदाजीही अशीच कुठचीही तांत्रिक चिरफाड न करता नुसती बघायची असते. भारताला दिलेले 192 धावांचे लक्ष्य या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजीला भुकेले ठेवणार होते; कारण दोन-चार फलंदाजांनाच संधी मिळेल ही अपेक्षा होती; पण हे छोटे लक्ष्य फसवे असते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामान्यात चेन्नईची खेळपट्टी गोलंदाजांना जरा तरी साथ देणारी होती; पण इथे तसे काही नव्हते. पाकिस्तानी गोलंदाज डावाच्या सुरुवातीलाच डोक्यावर बसणार नाहीत, याची काळजी रोहित शर्माने डावाच्या पहिल्या चेंडूवर शाहिन आफ्रिदीला पूल मारत चौकार वसूल करत घेतली. दुसरीकडून डेंग्यूतून बरा होत वाढलेल्या प्लेटलेटस्बरोबर उसळते रक्त घेऊन आल्यासारखा गिल खेळत होता. हसन अलीच्या पहिल्या षटकात तीन चौकार मारत त्याने आपला फिटनेस सिद्ध केला. गिल खेळणार, असे वाटत असतानाच आफ्रिदीचा चेंडू कट करायच्या नादात तो हकनाक बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध नेहमीच उत्तम खेळणारा कोहली जेव्हा मैदानात आला तेव्हा विराटच्या नावाचे टी शर्ट घालून बसलेल्या लाखो प्रेक्षकांच्या मनात एक आश्वासक भावना आली. शाहिन आफ्रिदीचा एक चेंडू कव्हर्समधून सीमापार पाठवताना मैदानावर हलणारी गोष्ट होती ती सीमारेषेकडे जाणारा चेंडू; पण शनिवारी पाकिस्तानविरुद्ध तारणहार कोहली नव्हता. ज्याप्रकारे रोहित शर्माचा मॅजिकल शो दुसर्‍या बाजूने चालू होता ते बघून समस्त प्रेक्षकांना हेवा वाटला असेल तो पाकिस्तानी खेळाडूंचा; कारण इतक्या जवळून हा शो फक्त त्यांनाच बघायला मिळणार होता.

शाहिन आफ्रिदी या मुख्य अस्त्रातील धार रोहित शर्माने काढून घेतल्यावर त्याने आपला मोर्चा वळवला तो हसन अली, नवाज आणि सर्वात शेवटी हॅरिस रौफविरुद्ध. हॅरिस रौफ त्याच्या कल्पक गोलंदाजीमुळे पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्वात डोकेबाज गोलंदाज आहे. त्याचे स्वागत रोहित शर्माने आपला एकदिवसीय सामन्यातील 300 वा षटकार मारून केले आणि त्याच षटकात अजून एक षटकार ठोकून रौफची कल्पकता तिथेच संपवली. विराट कोहलीही दुसर्‍या टोकाकडून हे एन्जॉय करत असेल. रोहित आणि विराटच विजयाचे घट बसवतील, असे वाटत असताना एका अचानक उसळलेल्या हसन अलीच्या चेंडूवर कोहलीचा पूल फसला आणि बाद झाला. श्रेयस अय्यरची सुरुवात चेंडूवरची नजर हटवून झाली; पण नंतर त्याने काही क्लासिक ड्राईव्हज् मारत आपली नजाकत दाखवली. हे दोन मुंबईकरच काम फत्ते करणार आणि त्यात रोहित शर्माचे विक्रमी आठवे शतक होणार, हे दिसत होते. कदाचित रोहित शर्माच्या फॉर्मला नजर लागायला नको म्हणून त्याचे हे शतक हुकले असावे. पुढे अय्यर आणि राहुलने पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या स्वप्नांना मूठमाती दिली आणि अहमदाबादची निळाई जल्लोषात बेभान झाली.

विश्वचषकाच्या महासामन्यात एक वेळ अशी होती की, पाकिस्तान सहज तीनशे-सव्वातीनशेचा टप्पा गाठेल. जेव्हा चेंडूला मूव्हमेंट मिळत नव्हती तेव्हा भारतीय गोलंदाजांनी लेंग्थमध्ये बदल करून अथवा बाऊन्समध्ये विविधता आणून बळी मिळवायचा प्रयत्न करायला हवा होता; पण भारताने पहिल्या सहा-सात षटकांत एक-दोनच बाऊन्सर टाकले. बुमराहला दुसर्‍या बाजूने हवी तशी साथ मिळत नव्हती. सिराजला रोहित शर्माने काय कानमंत्र दिला माहीत नाही; पण पुढच्याच चेंडूवर सिराजच्या खाली राहिलेल्या एका क्रॉस सिम चेंडूवर भारताला शफीकच्या रूपाने पहिले यश मिळाले. त्यानंतर बाबर आणि रिझवानचा जम बसला होता आणि भारतीय गोलंदाज बळी मिळवण्यात अन् धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पिनड्रॉप शांतता होती. बाबर आझमला या विश्वचषकात अजूनपर्यंत सूर गवसला नव्हता, तो गवसला असे वाटत होते. आपल्या अर्धशतकाबरोबर पाकिस्तानचे दीडशतक फक्त 29 षटकांत फलकावर लागल्यावर स्टेडियममध्ये अस्वस्थता पसरलेली दिसत होती. एकदिवसीय क्रिकेटच्या ढोबळ नियमाप्रमाणे हातात विकेटस् असल्या, तर तीस षटकांत जितक्या धावा असतात त्याच्या दुप्पट धावा होतील, हे सहज गृहीत धरायचे असते. इतक्यात, सिराजने तो जणू काही आजचा राखून ठेवलेला चेंडू टाकला. एका आत येणार्‍या थोड्याशा खाली बसलेल्या चेंडूवर बाबरचा त्रिफळा उडाला आणि नरेंद्र मोदी स्टेडियम जागे झाले.

‘भारत माता की जय’च्या घोषणांचा आवाज टिपेला पोहोचला आणि जणू काही या दडपणातच पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण खरे कारण होते ते बुमराह आणि कुलदीपच्या कल्पक गोलंदाजीचे. बाबर बाद झाल्यावर पाकिस्तानच्या आशा अर्थातच रिझवानकडून होत्या. शकील आणि इफ्तिखारला हाताशी घेऊन तो पाकिस्तानला तीनशेपार नेऊ शकला असता; पण तसे व्हायचे नव्हते. बाजी पलटते म्हणजे काय, हे कुलदीप आणि बुमराहने दाखवून दिले. एकाच षटकात कुलदीपने शकीलला गुगलीवर चकवून पायचित केले, तर इफ्तिखारला पुन्हा गुगलीवरच बाद केले. स्वीप करायला गेलेल्या इफ्तिखारच्या पायांना वळसा घालून चेंडू स्टंपला भेटायला गेला.

पुढच्याच षटकात एक क्लासिक ऑफ कटर कसा असतो याचे प्रात्यक्षिक बुमराहने रिझवानला दाखवत एका कमी वेगाच्या चेंडूला त्याच्या बॅट आणि पॅडमधून स्टंपचा रस्ता दाखवला. बाबर, शकील, इफ्तिखार आणि रिझवान ही पाकिस्तानची मधली फळी फक्त 27 चेंडूंत आणि 13 धावांत आपण कापून काढली. नवाज बॅट चालवू शकतो; पण सरदार धारातीर्थी पडल्यावर नवाजच्या बॅटमध्ये बळ उरले नाही. जडेजा आणि पंड्या यांनी उरलेले काम फत्ते करत पाकिस्तानचा डाव 191 धावांत 42.5 षटकांतच संपवला. बुमराहचा अनुभव आणि कुलदीपच्या विविधतेने आपण पाकिस्तानी फलंदाजीची इमारत बॉम्बहल्ल्यासारखी पाडली. रिझवानने त्या दिवशी आपले शतक गाझातील बंधू-भगिनींना समर्पित करून उगाच कुरापत काढली. आज त्याला 2 बाद 150 वरून सर्वबाद 191 होताना गाझातील इमारती कशा पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात, हेही त्यांच्या डावाकडे बघून कळले असेल.

Back to top button