पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय धावपटूंनी आज, सोमवारी (2 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धेची धावपट्टी चांगलीच गाजवली. 4X400 मीटर मिश्र रिले स्पर्धेत भारतीय चौकडी मोहम्मद अजमल, विथ्या रामराज, राजेश रमेश आणि सुभा वेंकटेशन यांनी अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीला कांस्यपदक जिंकले होते, पण दुस-यास्थावरील श्रीलंकेच्या धावपटूने लेन घुसखोरी केल्याने त्यांच्या संघाला स्पर्धेनंतर पंचांनी अपात्र ठरवले. त्यामुळे भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर पडली.यासह भारताच्या पदकांची संख्या 60 झाली असून यात रौप्य पदकांची संख्या 24 पर्यंत पोहचली आहे.
भारतीय महिला लांब उडीपटू एन्सी सोजनने आशियाई क्रीडा स्पर्धेत 6.63 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकले.
भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) रविवारी सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला होता. त्यानंतर सोमवारी याच स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी मैदान गाजवले. पारूल चौधरीने (वेळ : 9 मिनिटे 27.63 सेकंद) रौप्यपदक तर प्रिती लांबा ( वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) हिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
भारत 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह पदक क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम आहे. 'यंदा 100 मेडल पार' हे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आज 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 9व्या दिवसाची सुरुवात 3 कांस्य पदकांनी झाली. स्पीड स्केटिंगमध्ये प्रथम भारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले, त्यानंतर पुरुष संघानेही कांस्यपदक जिंकले. यानंतर महिला दुहेरीत टेबल टेनिसमध्येही कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीचा कोरियाकडून 4-3 असा पराभव झाला.
संजना भातुला, कार्तिक जगदीश्वरन, हिरल साधू आणि आरती कस्तुरी यांच्या महिला संघाने रोलर स्केटिंगमध्ये 3000 मीटर रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले. तर पुरुषांच्या 3000 मीटर स्पीड स्केटिंगमध्ये भारताच्या आर्यनपाल, आनंदकुमार, सिद्धांत आणि विक्रम यांच्या संघाने तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले.
पुरुष हॉकीमधील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर महिलांच्या कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाचा चायनीज तैपेईविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला. बॅडमिंटन एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्विक साईराज, रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने विजयासह पुढील फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरी बॅडमिंटनमध्ये कृष्णा प्रसाद आणि तनिषा क्रास्टो या जोडीने मकाऊ जोडीचा पराभव करत अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.