Asia Cup Final : पाकिस्तान vs श्रीलंका सामना वाहून गेल्यास कोण जाणार अंतिम फेरीत? | पुढारी

Asia Cup Final : पाकिस्तान vs श्रीलंका सामना वाहून गेल्यास कोण जाणार अंतिम फेरीत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Final : टीम इंडियाने आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. रोहित सेनेची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्धचा अजून एक सामना बाकी आहे, पण ती फक्त औपचारिकता आहे. दरम्यान, अंतिम फेरीसाठी एक संघ ठरला असताना दुसऱ्या संघाबाबत मात्र सस्पेंस कायम आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील एक संघ अंतिम फेरीत स्थान मिळवेल हे निश्चित असले तरी या सामन्यात पाऊस पडला तर काय समीकरणे तयार होतील हे महत्त्वाचे आहे.

सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाचा फायनलमध्ये प्रवेश

आशिया कपच्या (Asia Cup Final) सुपर 4 मध्ये अजून दोन सामने बाकी आहेत. 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा एक प्रकारचा बाद फेरीचा सामना असेल. तर 15 सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होईल. या सामन्याला फारसे महत्त्व नाही, कारण टीम इंडियाने आधीच दोन सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. जरी भारताने हा सामना हरला तरी भारतीय संघाच्या रनरेटवर कोणताही परिणाम होणार नाही. बांगलादेशचा संघ केवळ दोन गुण मिळवण्यात यशस्वी होईल, ज्याचा कुणालाही फायदा होणार नाही. कारण याआधी त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत. पण जर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल हा प्रश्न आहे.

तर पाकिस्तानचे नुकसान आणि श्रीलंकेचा फायदा

आशिया कपच्या (Asia Cup Final) सुपर 4 फेरीच्या पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर असून या फेरीतील दोन्ही सामने जिंकून संघाने चार गुणांची कमाई केली आहे. तसेच रोहितसेनेचा नेट रन रेट 2.690 आहे. यानंतर श्रीलंका सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने दोनपैकी एक सामना जिंकला आहे, तर एक गमावला आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण जमा आहेत, तर त्यांचा रन रेट -0.200 आहे. तिस-यास्थानी असणा-या पाकिस्ताननेनेही दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे. त्यांच्याकडेही दोन गुण जमा आहेत, पण त्यांचा रन रेट -1.892 आहे. म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानचे गुण समान आहेत पण रन रेटमध्ये श्रीलंक पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे. अशा स्थितीत पाकिस्तान आणि श्रीलंका हा सामना अजून बाकी आहे. 14 सप्टेंबर रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण या सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. जर खरच हा सामना पावसात वाहून गेल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. येथेही दोन्ही संघांचे गुण समान होतील पण रन रेटवर कोणताही परिणाम होणार नाही. ज्यामुळे उत्तम रन रेटच्या जोरावर श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

Back to top button