Rohit Sharma Sixer King : रोहित शर्मा बनला आशियाचा ‘सिक्सर किंग’! | पुढारी

Rohit Sharma Sixer King : रोहित शर्मा बनला आशियाचा ‘सिक्सर किंग’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Sixer King : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने शानदार अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने दोन शानदार षटकारही मारले. या षटकारांसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा विक्रमही मोडला आहे. खरं तर, रोहित हा आशिया कपच्या वनडे फॉरमॅटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. आशिया कपमध्ये त्याच्या नावावर एकूण 28 षटकार जमा झाले आहेत. रोहितने अवघ्या 25 डावात ही कामगिरी केली आहे.

रोहितचे 28 षटकार (Rohit Sharma Sixer King)

हिटमॅन रोहितने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची राजवट संपुष्टात आणली आहे. सध्या सुरू असलेल्या वनडे आशिया कपमधील श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात रोहितने 6.5 व्या षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार खेचला. याचबरोबर त्याचे आशिया कपमध्ये 27 षटकार झाले आणि तो या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. याच षटकाराच्या जोरावर त्याने वनडे क्रिकेट करिअरमधील 10 हजार धावांचा टप्पाही पार केला. त्यानंतर त्याने 10.2 व्या षटकात पाथिरानाला षटकार मारला आणि आशिया कपमधील आपल्या षटकारांची संख्या 28 पर्यंत पोहचवली.

आफ्रिदीच्या नावावर 26 षटकार

शाहिद आफ्रिदीच्या नावावर एकदिवसीय आशिया कपमध्ये एकूण 26 षटकार आहेत. या यादीत तो बराच काळ अव्वल स्थानी होता पण भारतीय कर्णधाराने त्याला मागे टाकले आहे. श्रीलंकेचा माजी स्टार खेळाडू सनथ जयसूर्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दिग्गज श्रीलंकन खेळाडूच्या नावावर एकदिवसीय आशिया कपमध्ये एकूण 23 षटकारांची नोंद आहे. (Rohit Sharma Sixer King)

चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना

चौथ्या क्रमांकावर भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना आहे. त्याने एकदिवसीय आशिया कपमध्ये 18 षटकार मारले आहेत. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचेही नाव या यादीत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात त्याने एकूण 13 षटकार ठोकले आहेत. तो पाचव्या स्थानी आहे.

आशिया कप (ODI) इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

रोहित शर्मा : 25 डावात 28 षटकार
शाहिद आफ्रिदी : 21 डावात 26 षटकार
सनथ जयसूर्या : 24 डावात 23 षटकार
सुरेश रैना : 13 डावात 18 षटकार
मोहम्मद नबी : 11 डावात 13 षटकार

Back to top button