कोलंबो : वृत्तसंस्था : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात भारतीय संघाची कामगिरी देदिप्यमान होत असून, पाकिस्तानवर प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने मंगळवारी श्रीलंकेला ४१ धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर झालेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली. भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने १७२ धावांची मजल मारली. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. लंकेच्या वेल्लालागे याने ५, तर चरिथ असलंकाने ४ विकेट घेतल्या. भारताकडून कुलदीप यादवने ४ आणि रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या. भारताचा पुढील सामना आता बांगला देशविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.
भारताला २१३ धावांत रोखल्यावर श्रीलंकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यास लंका संघ मैदानात आला; पण भारताला पहिले यश मिळवून द्यायला जसप्रीत बुमराहने वेळ लावला नाही, त्याने पथुम निसंका (६) याला यष्टिरक्षक के. एल. राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. कुसल मेंडीस (१५) याच्या रूपाने श्रीलंकेला दुसरा धक्काही बुमराहनेच दिला. सलामीला येऊन संघर्ष करणार्या दिमुथ करुणारत्नेला (२) सिराजने तंबूत धाडले. यानंतर कुलदीप यादवने सदिरा समरविक्रमा (१७) आणि चरिथ असलंका (२२) यांना पाठोपाठच्या षटकांत बाद केले. जडेजाने लंकेच्या पतनाला हातभार लावताना कर्णधार दासून शनाका (९) चा अडथळा दूर केला. यावेळी अवघ्या ९९ धावांत लंकेच्या ६ विकेट पडल्या होत्या. खेळपट्टीवर चेंडू वळत असल्यामुळे फलंदाजांना नीट खेळता येत नव्हते. त्यामुळे भारताचा विजय जवळ आल्याचे वाटत होते. परंतु, धनंजय डिसिल्व्हा आणि दुनित वेल्लालागे यांनी मैदानावर तंबू ठोकला. दोघांची भागीदारी हळूहळू पन्नाशीच्या पुढे गेली. त्यामुळे भारतीय तंबूवर चिंतेचे ढग दाटू लागले. अशावेळी संकटमोचक म्हणून रवींद्र जडेजा धावून आला, त्याने जम बसलेल्या धनंजय डिसिल्व्हाला फटक्याच्या मोहात पाडून बाद केले. ४१ धावांवर असताना गिलने त्याचा झेल घेतला. डिसिल्व्हा आणि वेल्लालागे यांनी ६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. वेल्लालागेला साथ देण्यासाठी आलेल्या महेश तिक्ष्णाने १४ चेंडू खेळू काढले, पण हार्दिकच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू सूर्यकुमारने त्याचा अप्रतिम झेल घेतल्याने तो २ धावांवर बाद झाला.
यानंतर श्रीलंकेच्या नाट्यावर पडदा टाकायला कुलदीप यादवचे दोन चेंडू पुरेेसे होते. त्याने आधी कासून रजिथा (१) आणि शेवटी मथिशा पथिराना (0) यांच्या दांड्या उडवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिल्यानंतर वेल्लालागेने वर्चस्व गाजवले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात शुभमनचा (१९) त्रिफळा उडवला, दुसर्या षटकात विराटला (३) झेलबाद केले अन् तिसर्या षटकात रोहितला (५३) त्रिफळाचित केले. के. एल. राहुल व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. श्रीलंकेच्या फिरकी मार्याचा दोघांनी संयमाने सामना केला; पण के. एल. राहुलचा संयम वेल्लालागेने तोडला. इशानसह ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करणारा के. एल. राहुल (३९) परतीचा झेल देऊन बाद झाला.
इशानने श्रीलंकेच्या फिरकीचा आत्मविश्वासाने चांगला सामना केला पण चरिथ असलंकाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ३३ (६१ चेंडू) धावांवर वेल्लालागेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथच्या अप्रतिम चेंडूवर रवींद्र जडेजा (४) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथने ४३ व्या षटकात जसप्रीत बुमराहचा (५) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवही गोल्डन डकवर परतला; पण त्याची हॅट्ट्रिक हुकली. पावसामुळे खेळ थांबला. भारताने ४७ षटकांत ९ बाद १९७ धावा केल्या होत्या. तासाभरानंतर खेळ सुरू झाला यात भारताने १६ धावांची भर घातल्याने भारताचा डाव २१३ धावांवर संपला.