राहुल द्रविड म्हणाला, दुखापतीमुळे मधल्या फळीचे गणित बिघडले | पुढारी

राहुल द्रविड म्हणाला, दुखापतीमुळे मधल्या फळीचे गणित बिघडले

बंगळूर, वृत्तसंस्था : 2019 चा वर्ल्डकप झाला, आता 2023 चा वर्ल्डकप तोंडावर आहे, तरीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे अद्याप ठरलेले दिसत नाही. आधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि आता राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी चौथ्या क्रमांकासाठी सातत्याने संघात प्रयोग केले; परंतु अजून प्रयोग सुरूच आहेत. मात्र, आशिया चषक स्पर्धेला एक दिवस शिल्लक असताना राहुल द्रविडने चौथ्या क्रमांकासाठीच्या प्रयोगशाळेवर स्पष्ट मत व्यक्त केले. या क्रमांकावरील फलंदाज 18 महिन्यांपूर्वीच ठरले होते. श्रेयस अय्यर, के. एल. राहुल व ऋषभ पंत हे चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी संघात फिट होते; परंतु दुर्दैवाने तीन महिन्यांच्या कालावधीत तिघेही दुखापतग्रस्त झाले.

भारतीय संघ मंगळवारी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी कोलंबोसाठी रवाना झाला; परंतु त्याआधीच पुन्हा दुखापतीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकेश राहुल पहिल्या दोन सामन्यांत (पाकिस्तान व नेपाळ विरुद्ध) खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत लोकेश राहुल थांबणार आहे आणि 4 सप्टेंबरला तो श्रीलंकेत दाखल होईल. मागील काही कालावधीपासून राहुल, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत हे दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. राहुल व अय्यर हे आशिया चषक स्पर्धेतून संघात पुनरागमन करत आहेत; पण त्यांच्या अनुपस्थितीत चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांचा प्रश्न निर्माण झाला होता.

सूर्यकुमार यादव याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला खेळवून पाहिले गेले; परंतु टी-20 क्रमवारीत नंबर वन असलेला सूर्या वन-डे क्रिकेटमध्ये काही खास करू शकला नाही. पंत अजूनही बराच काळ संघापासून बाहेर राहणार, हे स्पष्ट आहे. श्रेयसने कमबॅक केले आहे आणि तो 100 टक्के तंदुरुस्त आहे. आशिया चषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी तो पहिली पसंद असेल. ‘चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू फलंदाजी करू शकेल, यासाठी आम्ही खेळाडूंना रोटेट केले. जेव्हा खेळाडू उपलब्ध नव्हते, तेव्हा दुसर्‍या खेळाडूला संधी दिली आणि हे सातत्याने घडले, असे राहुल द्रविड म्हणाला.

हेही वाचा…

Back to top button