Rohit Sharma : हिटमॅन रोहितचे मोठे विधान, म्हणाला; ‘मला जो पसंत नाही त्याला वगळतो…’ | पुढारी

Rohit Sharma : हिटमॅन रोहितचे मोठे विधान, म्हणाला; ‘मला जो पसंत नाही त्याला वगळतो...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे. भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या 17 सदस्यीय मुख्य संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता प्लेईंग इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एका मुलाखतीत यावर मोठे विधान केले आहे.

‘जर कोणी दुर्दैवी असेल तर आपण काहीही करू शकत नाही’

आगामी आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) भारतीय संघ (Team India) आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. त्यापूर्वी रोहितने (Rohit Sharma) पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, समतोल संघ निवडताना काही खेळाडूंना वगळावे लागले आहे. मी आणि कोच राहुल द्रविड अशा खेळाडूंना संघात स्थान का मिळू शकले नाही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना त्याबद्दल सांगतो. मला जो पसंत नाही त्याला वगळतो, असे संघात होत नाही. कर्णधारपद तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी किंवा नापसंतीवर अवलंबून नसते. जर एखादा खेळाडू संघात नसेल तर त्याला कारणे असतात. या प्रकरणात कोणी दुर्दैवी असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही.’

प्लेईंग इलेव्हनची उत्सुकता

आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी तिलक वर्मा (Tilak Varma) सारख्या युवा खेळाडूचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुलचे (KL Rahul) पुनरागमन झाले आहे. असे असले तरी प्लेईंग इलेव्हनची सर्वांनाच उत्सुकता आहे. यादरम्यान संघाच्या निवडीबाबत कर्णधार रोहितने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संजू सॅमसनला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना स्थान न मिळाल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत या दोघांना स्थान न मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते.

रोहितने सांगितला ‘तो’ किस्सा (Rohit Sharma)

फिरकीपटू युझवेंद्र चहलला संघातून वगळण्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच रोहितने स्वत: बद्दलची एक आठवण सांगितली. तो म्हणाला की, ‘मला 2011 च्या विश्वचषकात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन संघात स्थान मिळू शकले नव्हते. त्यामुळे एखाद्याला वगळले तर मी स्वतःला त्या ठिकाणीही पाहतो. 2011 मध्ये माझी निवड झाली नाही तेव्हा मला वाईट वाटले. विश्वचषक संघातून वगळले जाणे याचे दु:ख काय असते हे मला चांगलेच माहीत आहे.’

Back to top button