सुधा मूर्ती यांचा ‘FIDE वर्ल्ड कप’वर चाहत्‍यांना सल्ला, ‘मुलाला टेन्शन देवू नका’

सुधा मूर्ती यांचा ‘FIDE वर्ल्ड कप’वर चाहत्‍यांना सल्ला, ‘मुलाला टेन्शन देवू नका’

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित मॅग्नसनविरूद्ध फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील दुसऱ्या क्लासिकल फेरीतही बरोबरी प्राप्त केली. गेली दाेन दिवस अंतिम सामन्‍याचा थरार भारतीय चाहत्‍यांनी अनुभवला आहे. आज या स्पर्धेतील विजेता टायब्रेकमध्ये ठरणार आहे. प्रज्ञानंदच्या यशासाठी करोडो भारतीय प्रार्थना करत आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि प्रख्‍यात लेखिका सुधा मूर्ती यांनी चाहत्‍यांना एक सल्‍ला दिला आहे.

अझरबैजानमधील बाकू येथे सूरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत मॅग्नस कार्लसन विरुद्ध प्रज्ञानंद आमने-सामने आहेत. दोन्ही ग्रँडमास्टर्सनी बुधवारी अडीच तास चाललेल्या डावात ३० चालीनंतर बरोबरीला साधली, यामुळे कोंडी कायम राहिली आहे.

त्याने शांततेने त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे

२४ ऑगस्टला प्रज्ञानंद कशी कामगिरी करेल, या प्रश्नावर सुधा मूर्ती म्हणाल्या की, "त्याला जिंकायचे आहे असे म्हणून मला त्याचा तणाव वाढवायचा नाही. त्याने शांततेने त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे मला वाटते. जो खेळात चांगला असेल त्याला विजेतेपद मिळेल. हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. लोकांनी कोणत्याही खेळामध्ये खेळाडूला टेंन्शन द्यायला नको. त्यांना नेहमी शांत मनाने खेळू द्यावे. आपण मुलाचा तणाव वाढवू नये," असेही त्‍यांनी म्हटले आहे.

प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम

बुद्धिबळातील ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. तर वयाच्या १६ व्या वर्षी तो जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला हाेता. सध्या तो अझरबैजानमध्ये फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील मॅग्नस कार्लसनविरुद्ध अंतिम सामना खेळत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news