Chandrayaan-3 च्या यशानंतर आता आदित्य एल-१ मोहीम, कधी होणार प्रक्षेपण? ISRO ने दिली माहिती

Chandrayaan-3 च्या यशानंतर आता आदित्य एल-१ मोहीम, कधी होणार प्रक्षेपण? ISRO ने दिली माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता आदित्य एल-१ (Aditya L-1) आणि गगनयान मोहिमेच्या तयारीला लागली आहे. या मोहिमेविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. "सूर्य आणि भोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने आदित्य मोहीम आखली आहे. ही मोहिम सप्टेंबरमध्ये प्रक्षेपणासाठी सज्ज होत आहे. गगनयानचे (Gaganyaan mission) काम प्रगतीपथावर आहे. आम्ही कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या अखेरीस क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक मोहीम करू. त्यानंतर २०२५ पर्यंत पहिली मानवयुक्त मोहीम होईपर्यंत अनेक चाचणी मोहिमा केल्या जातील." असे एस. सोमनाथ यांनी सांगितले.

३ लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या 'चांद्रयान-३'ने बुधवारी इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. चांद्रयानाच्या 'विक्रम' लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय टेकवले आणि अवघा देश आनंदाने बेभान झाला. 'इस्रो'च्या मुख्यालयात श्वास रोखून धरलेल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आनंदाने एकच जल्लोष केला. या मोहिमेच्या यशानंतर आता इस्रोने आदित्य L-1 च्या प्रेक्षपणाची तयारी केली आहे. यातून सूर्याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य L-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय मोहीम असेल. पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती यान हेलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाणार आहे. या मोहिमेमुळे सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचालींचे निरीक्षण करण्याचा आणि रिअल टाइममध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा काय परिणाम होतो हे कळणार आहे.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या (कोरोना) सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी अंतराळ यानामध्ये सात पेलोड असतील. विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 च्या माध्यमातून चार पेलोड्स थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लॅग्रेंज पॉइंट L1 वर कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील, असे इस्रोने म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news