‘हे’ क्रिकेटपटू करतात रिझर्व्ह बँकेत नोकरी! | पुढारी

'हे' क्रिकेटपटू करतात रिझर्व्ह बँकेत नोकरी!

नवी दिल्ली : भारतात क्रिकेटपटूंना त्यांच्या मैदानावरील कामगिरीसाठी सन्मानित केले जाते. शिवाय, यातील काही खेळाडूंना सरकारी नोकरीतही सामावून घेतले जाते. या नोकर्‍यांमधून त्यांचा पगारही गलेलठ्ठ असतो. सध्या रिझर्व्ह बँकेत कार्यरत असलेल्या 5 भारतीय  क्रिकेटपटूंचा हा संक्षिप्त लेखाजोखा…

उमेश यादव : या मध्यमगती गोलंदाजाला 2017 मध्ये आरबीआयच्या नागपूर शाखेतील सेवेत सामावून घेण्यात आले. सहायक प्रबंधक या पदावर उमेश यादव कार्यरत आहे. उमेशने पोलिस निरीक्षक पदासाठी देखील तयारी केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. नंतर तो 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सेवेत रुजू झाला.

के. एल. राहुल : भारताचा हा यष्टिरक्षक-फलंदाजदेखील रिझर्व्ह बँकेत सहायक प्रबंधक पदावर कार्यरत आहे. आश्चर्य म्हणजे के.एल. राहुलने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, त्याचे आई-वडील तो संघात येण्यापेक्षा बँकेत नोकरीला लागला, त्यावेळी जास्त खूश झाले होते!

इशान किशन : छोट्या चणीचा इशान किशन देखील व्यावसायिक क्रिकेटपटू असण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेतही सेवा बजावतो. इशान आरबीआयच्या पाटणा शाखेत असिस्टंट मॅनेजर पदावर 2017 मध्ये रुजू झाला आहे.

शाहबाज नदीम : भारतीय संघातर्फे दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळालेला शाहबाज नदीम आयपीएलमध्ये स्वत:चा ठसा उमटवण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. शाहबाजला खेळाडूंच्या कोट्यातून आरबीआयमध्ये नोकरी मिळाली.

दीपक हुडा : आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंटस्तर्फे खेळणारा दीपक हुडा हा महत्त्वाचा खेळाडूही आपल्या अन्य काही राष्ट्रीय सहकार्‍यांप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या सेवेत आहे. त्यालाही खेळाडूंच्या कोट्यातून संधी मिळाली आहे.

Back to top button