बाकू : वृत्तसंस्था भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित मॅग्नसनविरुद्ध फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील दुसर्या क्लासिकल फेरीतही बरोबरी प्राप्त केली आणि यामुळे कोंडी कायम राहिली आहे. दोन्ही इंटरनॅशनल ग्रँडमास्टर्सनी अडीच तास चाललेल्या या डावात 30 चालीनंतर बरोबरीला मान्यता दिली. आता या स्पर्धेतील विजेता गुरुवारी टायब्रेकमध्ये होईल. अझरबैजानमधील बाकू येथे ही स्पर्धा सुरू आहे.
कार्लसनने प्रज्ञानंदविरुद्ध पांढर्या मोहर्यांनी खेळताना अतिशय भक्कम खेळ साकारला. काळ्या मोहर्यांनी खेळणार्या भारताच्या प्रज्ञानंदला येथे बरोबरीसाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. बिशप एडिंगनंतर 30 चालीअखेर दोन्ही दिग्गजांनी बरोबरीला मान्यता दिली. यापूर्वी या स्पर्धेत मंगळवारी झालेला पहिला डावदेखील बरोबरीत सुटला होता.
बुधवारी दुसर्या क्लासिकल डावात दोन्ही खेळाडूंनी हत्तींची अदलाबदली केली आणि तिथेच हा डावदेखील बरोबरीत राहणार, याचे स्पष्ट संकेत मिळाले. पहिल्या 22 चालीअखेर एकाही खेळाडूला वर्चस्व गाजवता आले नव्हते. यामुळे पहिल्या डावातील निकालाची येथेही पुनरावृत्ती होणार, असे चित्र होते आणि उभयतांपैकी एकाही खेळाडूने धोका स्वीकारणे टाळल्याने फारसा वेगळा निकाल लागला नाही.
16 व्या चालीपर्यंत कार्लसन अधिक आक्रमक खेळत होता. पण, शांत चित्ताने खेळणार्या आर. प्रज्ञानंदने परिस्थिती आटोक्याखाली राहील, याची पुरेपूर दक्षता घेतली होती. कार्लसन टायब्रेक टाळण्यासाठी या दुसर्या क्लासिकल फेरीतच विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणे साहजिक होते आणि पहिल्या 15 चालीपर्यंत कार्लसनच्या खेळीत याचे प्रतिबिंब उमटले देखील; पण आर. प्रज्ञानंदने आपल्या बचावात अजिबात कसर सोडली नाही. यामुळे कार्लसनला फारसा वाव मिळण्याचे कारण नव्हते.
मंगळवारच्या पहिल्या डावात दोन्ही ग्रँडमास्टर्समध्ये तब्बल 4 तास झुंज रंगली. शिवाय, 70 पेक्षा अधिक चाली झाल्या. त्यानंतर कार्लसनने आपला खेळ अपेक्षेप्रमाणे बहरला नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. 18 वर्षीय आर. प्रज्ञानंदने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सोमवारी फॅबिआनो कारुआनाला पराभवाचा धक्का देत एकच खळबळ उडवून दिली होती. जागतिक क्रमवारीतील तिसर्या मानांकित कारुआनाचे आव्हान त्यावेळी टायब्रेकमध्ये संपुष्टात आले होते. या स्पर्धेतील विजेत्याला 1 लाख 10 हजार डॉलर्स तर उपविजेत्याला 80 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.
आर. प्रज्ञानंद यानंतर कँडिडेटस् स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारा तिसरा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. यापूर्वी लिजेंडरी बॉबी फिशर व कार्लसन यांनी कमी वयात या स्पर्धेची पात्रता संपादन करण्याचा पराक्रम गाजवला आहे. कँडिडेटस् स्पर्धेतील विजेता विद्यमान विश्वविजेत्याला आव्हान देतो आणि यामुळे कँडिडेटस स्पर्धेत पात्रता मिळवणे ही विश्वजेतेपदाच्या दिशेने महत्त्वाची आगेकूच ठरते.