Rinku Singh Record : रिंकू सिंहने पदार्पणाच्या डावात तिलक वर्मा, इशान किशनला टाकले मागे | पुढारी

Rinku Singh Record : रिंकू सिंहने पदार्पणाच्या डावात तिलक वर्मा, इशान किशनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rinku Singh : आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या रिंकू सिंहला दुस-या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने जबरदस्त खेळी करून चाहत्यांसह भारतीय निवडकर्त्यांचे मन जिंकले. विशेष म्हणजे त्याने आपल्या पहिल्याच फलंदाजी डावात तिलक वर्मा आणि ईशान किशनला मागे टाकले.

पदार्पणाच्या डावात सर्वात वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजी

रिंकू सिंह (Rinku Singh Record) आपल्या पदार्पणाच्या डावात सर्वात वेगवान स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने तिलक वर्मा (Tilak Varma), ईशान किशन (Ishan Kishan) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना मागे टाकले आहे. भारतासाठी टी-20 (Team India T20) पदार्पणाच्या डावात सर्वात वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजी करण्यात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आघाडीवर आहे.

पदार्पणाच्या डावात सर्वात वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजी करणारे खेळाडू

सूर्यकुमार यादव : 180.95 स्ट्राइक रेट : 57 धावा : विरुद्ध इंग्लंड
रिंकू सिंह : 180.95 स्ट्राइक रेट : 38 धावा : विरुद्ध आयर्लंड
तिलक वर्मा : 177.27 स्ट्राईक रेट : 39 धावा : विरुद्ध वेस्ट इंडिज
इशान किशन : 175 स्ट्राईक रेट : 56 धावा : विरुद्ध इंग्लंड
अजिंक्य रहाणे : 156.41 स्ट्राईक रेट : 51 धावा : विरुद्ध इंग्लंड

सूर्या आणि रिंकूमध्ये साम्य (Rinku Singh Record)

रिंकू सिंहने (Rinku Singh Record) आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवलाही पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण त्याने दुसऱ्याच सामन्यात आपल्या पहिल्यावहिल्या डावात अर्धशतक झळकावले.

रिंकूचे आणखी दोन विक्रम (Rinku Singh Record)

आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 12.2 षटकात 105 धावांवर तीन विकेट गमावल्या तेव्हा रिंकू फलंदाजीला मैदानात उतरला. स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी चालून आली आहे, याची जाणीव रिंकूला होती. त्याने या संधीचे सोने करायचे हे मनाशी पक्के केल्याचे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होते. रिंकूने 180.95 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना केवळ 21 चेंडूत 38 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रिंकूच्या या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली.

टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रिंकूने 38 धावांसह 9 व्या स्थानी झेप घेतली. याशिवाय त्याने पदार्पणाच्याच डावातच सामनावीराचा किताब पटकावला. फार कमी भारतीय खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे.

Back to top button