Team India Asia Cup : अश्विन-चहलसाठी वर्ल्डकपचे दरवाजे बंद? कर्णधार रोहित म्हणाला… | पुढारी

Team India Asia Cup : अश्विन-चहलसाठी वर्ल्डकपचे दरवाजे बंद? कर्णधार रोहित म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Asia Cup : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी (21 ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असून या संघात तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलकने दमदार कामगिरी केली होती. दरम्यान, गोलंदाजी विभागात मात्र दिग्गज ऑफस्पिनर आर. अश्विन आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांना स्थान मिळालेले नाही. हे दोघे संघात नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान कर्णधार रोहित शर्माने अश्विन-चहलबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. रोहितच्या म्हणण्यानुसार, अश्विन-चहन हे दोघे अजूनही वर्ल्ड कप प्लॅनचा भाग आहेत. तो म्हणाला, ‘आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरसह कोणत्याही खेळाडूसाठी वर्ल्ड कप संघात सामील होण्याचे दरवाजे बंद नाहीत. आशिया कपसाठी 17 खेळाडूंचा संघ निवडायचा होता त्यामुळे आम्हाला निवडीबाबचे काही कठोर निर्णय घ्यावे लागले.’ (Team India Asia Cup)

अक्षरच्या रुपात डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय

डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलबद्दल रोहित म्हणाला, ‘आम्हाला असा खेळाडू हवा होता जो 8 किंवा 9व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. अक्षरने यावर्षी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्या रुपाने आम्हाला डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय मिळाला आहे.’ दुसरीकडे, टॉप-3 फलंदाजांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही रोहितने स्पष्ट केले. म्हणजेच रोहित-गिल सलामी देतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. (Team India Asia Cup)

फक्त एकच फिरकी गोलंदाज का निवडला?

आशिया कपसाठी भारतीय संघात कुलदीप यादवच्या रूपात एकच फिरकीपटू असेल. याविषयी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, ‘अक्षर पटेलने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे आणि तो फलंदाजीही करू शकतो. कुलदीपनेही चांगली कामगिरी केली आहे. दोन फिरकीपटू फिट करणे कठीण होते, म्हणूनच आम्ही कुलदीपच्या बजूने कौल दिला.’

आशिया कप स्पर्धेसाठी भारताचा 17 सदस्यीय संघ : (Team India Asia Cup)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

Back to top button