World Cup 2023 : भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली; आता 'या' दिवशी येणार आमने-सामने | पुढारी

World Cup 2023 : भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली; आता 'या' दिवशी येणार आमने-सामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक असलेला भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे याआधी दोन्ही संघांमधील हा सामना १५ ऑक्टोबरला होणार होता. मात्र, नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने सामन्याची तारीख एक दिवस आधी बदलण्यात आली.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या आणखी एका सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये १२ ऑक्टोबरऐवजी १० ऑक्टोबरला श्रीलंकेशी भिडणार आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तीन दिवसांचे अंतर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रीनिमित्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला उत्सवाच्या निमित्ताने या सामन्याची तारीख बदलण्यास सांगितले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरक्षा पथके व्यस्त राहणार असल्याने सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण जाईल, असे सुरक्षा एजन्सींनी सांगितले होते. यानंतर आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानच्या सामन्यांच्या तारखेत बदल करण्याबाबत पीसीबीशी चर्चा केली. आयसीसी लवकरच याबाबत अपडेटेड वेळापत्रक जारी करू शकते. त्यामुळे आणखी काही संघांच्या सामन्यांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

हेही वाचा : 

Back to top button