Ashes New Record : इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने मिळून मोडला 95 वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम | पुढारी

Ashes New Record : इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने मिळून मोडला 95 वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashes New Record : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी दरम्यान, दोन्ही संघांनी मिळून 95 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला. ओव्हल कसोटीत दोन्ही संघांच्या एकाही फलंदाजाला शतक झळकवाता आले नाही, पण तरीही सामन्यात एकूण 1307 धावा झाल्या. याचबरोबर एकाही खेळाडूने शतक न पूर्ण करता एका कसोटीत सर्वाधिक धावा होण्याच्या विक्रमाची नव्याने नोंद झाली आहे. याआधी 1928 मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात कोणत्याही वैयक्तिक शतकाशिवाय 1272 धावा झाल्या होत्या.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5व्या कसोटीत एकूण 9 अर्धशतके झाली, तर जो रूट हा एकमेव खेळाडू होता जो 90 धावांच्या पुढे पोहोचू शकला. 91 च्या वैयक्तिक धावसंख्येवर टॉड मर्फीने त्याला क्लीन बोल्ड करून तंबूत पाठवले. तर हॅरी ब्रूकने 85 धावा फटकावल्या. Ashes New Record

वैयक्तिक शतकाशिवाय कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा (Ashes New Record)

1307 धावा : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल (2023)
1272 धावा : द. अफ्रिका विरुद्ध इंग्लंड, डर्बन (1928)
1262 धावा : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नॉटिंगहॅम (1997)
1227 धावा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, मेलबर्न (1961)
1225 धावा : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल (1993)

ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. अॅशेस 2023 चे पहिले दोन सामने गमावल्यानंतर बेन स्टोक्सच्या संघाने जोरदार केले. मालिकेतील चौथा सामना पावसामुळे वाहून गेला नसता तर इंग्लंडला मालिका 3-2 ने जिंकता आली असती.

ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ 384 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 334 धावांवर गारद झाला. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी 140 धावांची भागीदारी करून कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली, मात्र चेंडू बदलल्याने ऑस्ट्रेलियाचे नशीब पालटले. 28 धावांच्या आत वॉर्नर, ख्वाजा आणि लबुशेनच्या रूपाने इंग्लंडला तीन यश मिळाले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 95 धावांची भागीदारी करत संघाला सांभाळले, पण ते बाद होताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला.

Back to top button