फिफा महिला विश्वचषक : जपानविरुद्ध स्पेनचा धुव्वा; नायजेरियाही बाद फेरीत | पुढारी

फिफा महिला विश्वचषक : जपानविरुद्ध स्पेनचा धुव्वा; नायजेरियाही बाद फेरीत

वेलिंग्टन, वृत्तसंस्था : हिनाटा मियाझावाने दुहेरी गोल केल्यानंतर माजी चॅम्पियन्स जपानने बलाढ्य स्पेनचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. स्ट्रायकर रिको व बदली खेळाडू मोमोको यांनीही प्रत्येकी एक गोल करत या विजयात मोलाचा वाटा उचलला. 2011 विश्वचषक स्पर्धेतील विजेते व 2015 मधील उपजेते ठरलेल्या जपानचा संघ किवी राजधानीतच थांबणार असून, शनिवारी नॉर्वेविरुद्ध त्यांची बाद फेरीतील लढत होईल. याचवेळी स्पेनचा संघ स्वित्झर्लंडविरुद्ध पुढील लढत खेळणार आहे.

जपान व स्पेन यांचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित झाले आहे. आपल्या पहिल्या दोन्ही लढतींत विजय मिळवला असल्याने त्यांची आगेकूच औपचारिक झाली. या पार्श्वभूमीवर जपानचे प्रशिक्षक फुतोशी इकेदा यांनी वेलिंग्टन रिजनल स्टेडियमवरील या सामन्यासाठी संघात 5 बदल केले.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने कॅनडाचा 4-0 असा धुव्वा उडवत शेवटच्या 16 संघांत आपले स्थान निश्चित केले. मेलबर्नमधील रेक्टँग्युलर स्टेडियमवरील या लढतीत रॅसोने नवव्या मिनिटाला पहिला, तर 39 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला.

विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या झाम्बियाने कारकिर्दीतील आपला पहिलावहिला विजय नोंदवताना कोस्टारिकाचा 3-1 असा फडशा पाडला. हे दोन्ही संघ बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकले गेले असल्याने या लढतीला फारसे महत्त्व नव्हते. कोस्टारिकाचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्यांना साखळी फेरीतील 3 पैकी एकही सामना जिंकता आला नाही.

नायजेरियाचीही आगेकूच (फिफा महिला विश्वचषक)

अन्य एका लढतीत नायजेरियाने ‘ब’ गटातील आपल्या शेवटच्या लढतीत आयर्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले आणि स्पर्धेच्या इतिहासात तिसर्‍यांदा बाद फेरी गाठली. या लढतीपूर्वी नायजेरियाचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी होता आणि शेवटच्या 16 मध्ये पोहोचण्यासाठी केवळ पराभव टाळला, तरी त्यांच्यासाठी हे पुरेसे ठरणार होते. नायजेरियाचा संघ आता शेवटच्या 16 मधील प्रतिस्पर्धी कोण असेल, या प्रतीक्षेत असणार आहे.

Back to top button