Cricket World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? जाणून घ्‍या कारण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि पाकिस्‍तान क्रिकेट सामना म्‍हटलं की, क्रिकेटप्रेमींसह संपूर्ण देशवासीयांच्‍या नजरा याकडे लागतात. हा केवळ क्रिकेटमधील संघर्ष नसतो. पाकिस्‍तानचा मैदानावरील पराभव हा अनेकार्थाने क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असते. त्‍यामुळे जगात कोठेही या दोन्‍ही संघांमधील होणारा सामना क्रीडा विश्‍वातील सर्वात मोठा इव्हेंट ठरतो. आता वन-डे विश्‍वचषकामधील ऑक्‍टोबरमध्‍ये होणार्‍या भारत आणि पाकिस्‍तान सामन्‍याकडे दोन्‍ही देशातील क्रिकेटप्रेमीचे लक्ष वेधले आहे. मात्र या सामन्‍याच्‍या तारखेमध्‍ये बदल होण्‍याची शक्‍यता आहे. ( Cricket World Cup 2023 )

'बीसीसीआय'ने सामना तारखेबाबत पुनर्विचार करावा'

वन-डे विश्‍वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्‍तान सामना अहमदाबादमध्‍ये १५ ऑक्‍टोबर रोजी होणार होता. मात्र या दिवशीच नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. गुजरातमध्‍ये गरबा रात्री साजरा केला जातो. त्‍यामुळे सुरक्षेच्‍या कारणास्‍तव सुरक्षा संस्‍थांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्‍याबाबत पुनर्विचार करावा, असा सल्‍ला दिला आहे. त्‍यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्‍यात होणारी विश्‍वचषक सामन्‍याची तारीख बदलली जाणार असून, आता हा सामना १४ ऑक्‍टाेबर राेजी हाेण्‍याची शक्‍यता असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

'बीसीसीआय'नेही सामन्‍याची तारीख बदलण्‍याची विनंती केल्‍याच्‍या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत तत्‍काळ निर्णय घेणे शक्‍य नाही. कारण क्रिकेटच्‍या एका आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यामागे अनेक गोष्‍टी असतात. त्‍यामुळे अंतिम चर्चा केल्‍यानंतर सामन्‍याची तारीख बदलली जावू शकते, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. ( Cricket World Cup 2023 )

वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेतील भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील सामना १५ ऑक्‍टोबर रोजी अहमदाबादच्‍या नरेंद्र मोदी स्‍टेडियमवर होणार आहे. या काळात नवरात्रोत्‍सवामुळे अहमदाबादला बाहेरहून येणार्‍या प्रेक्षकांना हॉटेलमध्‍ये राहण्‍याची सोय हा मोठा प्रश्‍न असणार आहे. त्‍यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची नवीन तारीख जाहीर केली गेली तर काहींना तिकीट रद्‍द करण्‍याची नामुष्‍की ओढावेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

Cricket World Cup 2023 : वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचे वर्चस्‍व

पाकिस्‍तान विरुद्‍ध आजपर्यंतच्‍या वन-डे (एकदिवसीय) विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्‍व राहिले आहे. १९९२ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियाच्‍या सिडनी क्रिकेट मैदानावर दोन्‍ही संघांमध्‍ये सामना झाला होता. या सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानचा पराभव केला. यानंतर सलग पाच विश्‍वचषक स्‍पर्धांमध्‍ये भारताने आपले वर्चस्‍व कायम ठेवले आहे. त्‍यामुळेच यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील भारत-पाकिस्‍तान सामन्‍याकडे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news