

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणत्या सामन्यात काय होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. फलंदाजांचा दिवस असेल तर गोलंदाजांचे काही खरे नसते. दुसरीकडे, गोलंदाजांचा दिवस असेल तर फलंदाज अक्षरश: धावा काढण्यासाठी तळमळतात. असाच एक क्षण महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहायला मिळाला. जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा पूर्ण धुव्वा उडाला आणि विरोधी संघाने अवघ्या 4 चेंडूत सामना जिंकला.
एसईए गेम्स वुमेन्स टी-20 स्पर्धेचा दुसरा सामना थायलंड आणि फिलीपिन्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फिलीपिन्स संघाने 11.1 षटकात केवळ 9 धावा केल्या. प्रत्युत्तरात इतर संघाने अवघ्या 4 चेंडूत एकही विकेट न गमावता 10 धावा केल्या आणि 10 गडी राखून विजय मिळवला. फिलिपाइन्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.
फिलिपाइन्सच्या संघासाठी चार फलंदाजांनी प्रत्येकी दोन-दोन धावा केल्या, तर एक अतिरिक्त धाव मिळाली. अशा प्रकारे एकूण 9 धावांपर्यंत मजल मारता आली. थायलंडकडून थिपाचा पुथावोंग हिने सर्वाधिक 4 आणि ओनिचा कामचोम्फुकोने 3 बळी घेतले. नट्टाया बूचथम हिला एक विकेट घेण्यात यश आले.
अवघ्या 10 धावांचा सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाने 4 चेंडूतच सामना संपवला. कर्णधार नन्नपत कोंचारोएनकाई हिने 2 चेंडूत नाबाद 3, तर नत्थाकन चँथमने 2 चेंडूंत एका चौकाराच्या जोरावर नाबाद 6 धावा केल्या. याचबरोबर थालंडने 10 विकेट्स आणि तब्बल 116 चेंडू राखून सर्वात मोठा विजय मिळवला.
सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम मालदीवच्या नावावर आहे. 2019 मध्ये हा संघ बांगलादेश आणि रवांडा विरुद्ध 6 धावांवर ऑलआऊट झाला होता. तर त्याच वर्षी नेपाळविरुद्ध त्यांचा संपूर्ण डाव 8 धावांवर संपुष्टात आला होता. यानंतर तिसर्या क्रमांकावर फिलिपाइन्स क्रिकेट संघ येतो, ज्यांचा 9 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला.