Wrestlers Protest : बजरंग, विनेश प्रशिक्षणासाठी लवकरच विदेश दौर्‍यावर | पुढारी

Wrestlers Protest : बजरंग, विनेश प्रशिक्षणासाठी लवकरच विदेश दौर्‍यावर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या बजरंग पुनिया व विनेश फोगट यांनी आता आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आशिया स्पर्धा व वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्रता फेरी नजरेसमोर ठेवत हे दोघेही आघाडीचे मल्ल विदेशात प्रशिक्षण घेतील, असे संकेत आहेत. बजरंग पुनिया ईसिक-कुल व विनेश फोगट विश्केक-बुडापेस्ट येथे प्रशिक्षणासाठी रवाना होतील, असा होरा आहे. (Wrestlers Protest)

यापूर्वी, बि—जभूषण यांच्याविरोधात पुकारलेले आंदोलन अपेक्षेपेक्षाही अधिक लांबल्यानंतर यात सहभागी मल्लांना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चिंता लागली असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. बजरंग व विनेश यांनी याच आठवड्यात विदेशात प्रशिक्षणाचा प्रस्ताव घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यंदाची आशियाई स्पर्धा हँग्झू व वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा बेलग्रेडमध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर दि. 5 ते 15 ऑगस्ट या कालावधीत चाचणी स्पर्धा होणे अपेक्षित आहे. (Wrestlers Protest )

हँग्झू येथील आशियाई स्पर्धा दि. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर तर बेलग्रेड येथील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दि. 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेशने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) विभागाची थेट भेट घेत किर्गिस्तानमधील बिश्केक येथे दि. 2 ते 10 जुलै व हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये दि. 10 ते 28 जुलै या कालावधीत प्रशिक्षण शिबिरासाठी परवानगी देण्याची मागणी केली.

विनेश बुडापेस्टमधील प्रशिक्षणादरम्यान दि. 13 ते 16 जुलै या कालावधीत चौथ्या आंतरराष्ट्रीय मानांकन सीरिज स्पर्धेत सहभागी होईल. गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेनंतर ती प्रथमच एखाद्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. या दौर्‍यात विनेशसह तिची फिजिओ अश्विनी जीवन पाटील, स्पेयरिंग पार्टनर संगीता फोगट व प्रशिक्षक सुदेश पाटील सहभागी होतील, असे संकेत आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यजेता बजरंग पुनिया किर्गिस्तान येथील प्रशिक्षण स्पर्धेत सहभागी होण्याकरिता 36 दिवस दौर्‍यावर असेल. त्याच्यासमवेत प्रशिक्षक सुजीत मान, फिजिओ अनुज गुप्ता, स्पेयरिंग पार्टनर जितेंदर किन्हा व स्ट्रेंथ, कंडिशनिंग तज्ज्ञ काझी हसन देखील या दौर्‍यावर जाणार आहेत. बजरंगचा प्रस्ताव टॉप्सने 28 जून रोजी स्वीकारला आणि गुरुवारी तो मंजूर केला. गुप्ता व हसन यांचा खर्च केंद्र सरकार करणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा;

Back to top button