Heavy Rainfall : सिमल्यासह आसामात पूरस्थिती, दिल्लीतही पावसाचा कहर | पुढारी

Heavy Rainfall : सिमल्यासह आसामात पूरस्थिती, दिल्लीतही पावसाचा कहर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय हवामान खात्याने देशाच्या पूर्व, मध्य, उत्तर-पश्चिम आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मान्सून तीन दिवस सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. येत्या 24 तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह 23 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, हिमाचल प्रदेशातील सिमल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आगामी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rainfall)

देशभर मान्सूनची वाटचाल सामान्य वेगापेक्षा कमी आहे. सध्या देशात 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. वायव्येकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 42 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीला पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे गुरुग्रामसह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Heavy Rainfall)

आसाममधील पूरस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, तेथील 6 जिल्ह्यांमध्ये 83 हजार लोक अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. मृतांचा आकडा 7 वर पोहोचला आहे. (Heavy Rainfall)

या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज ः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम-पूर्व राजस्थान, पश्चिम-पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पूर्व पश्चिम मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटक, केरळ, अंदमान-निकोबार.

मुसळधार पाऊस झालेल्या सर्व राज्यांच्या काही भागांत हलका पाऊस पडेल. याशिवाय तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, दक्षिण कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या ठिकाणीही रिमझिम पाऊस होऊ शकतो.

मध्य प्रदेशात थैमान

मध्य प्रदेशातील सिवनी येथे पाच जण नदीच्या भोवर्‍यात सापडले. त्यांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. जबलपूर-इटारसी मार्गावरील रूळ पाण्याखाली गेल्यामुळे सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच आसाममधील संपूर्ण बारपेठा जिल्ह्यासह अनेक भागांना पुराने वेढा दिला आहे.

अधिक वाचा :

Back to top button