बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : पावसाने बेरंग झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चांगलाच रंग भरला आणि चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करीत यजमान इंग्लंडविरुद्ध 2 विकेटस्नी विजय खेचून आणला. (Ashes 2023)
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेरीस 3 बाद 107 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्यामुळे 67 षटके हाती उरली होती. यात ऑस्ट्रेलियाला 174 धावा करायच्या होत्या, किंवा इंग्लंडला 7 विकेटस् घ्यायच्या होत्या; पण ऑस्ट्रेलियाची यात सरशी झाली. त्यांनी 8 बाद 282 धावा केल्या आणि विजयश्री मिळवली. उस्मान ख्वाजा (65) आणि पॅट कमिन्स (44*) हे विजयाचे शिल्पकार ठरले. पाचव्या दिवशी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी सव्वादोन वाजता सामना सुरू झाला. (Ashes 2023)
ऑस्ट्रेलियाने 3 बाद 107 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कालचा नाबाद नाईट वॉचमन स्कॉट बोलँड दिवसातील पहिला बळी ठरला. ब्रॉडने त्याला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडला मोईन अलीने रूटकरवी झेलबाद केले. ख्वाजाने मग कॅमेरून ग्रीनसोबत जोडी जमवली. रॉबीनसनने 28 धावांवर त्याचा त्रिफळा उडवला.
एका बाजूने बळी जात असताना उस्मान ख्वाजा मात्र चिकाटीने अडून बसला होता. शेवटी कर्णधार स्टोक्सने 65 धावा करणार्या ख्वाजाचा त्रिफळा उडवला. अॅलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्सने टार्गेट हळूहळू जवळ केले. 20 धावांवर कॅरी बाद झाल्याने इंग्लंड पुन्हा डावात आले. यावेळी विजय 54 धावा दूर होता. कमिन्सने लायनला साथीला घेत किल्ला लढवला आणि 4.3 षटके शिल्लक असताना 281 धावांचे विजयी लक्ष्य गाठले.
हेही वाचा;