परभणी, पुढारी वृत्तसेवा : पाथरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार संगीता नामदेवराव वाघमारे यांना मंगळवारी (दि. १३) दुपारी पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
जायकवाडी प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण करुन वास्तव्यास असणारे व अवैध व्यवसाय करणारे यांच्या विरोधात तक्रारकर्त्याने त्रास पोटी उपोषण केले होते. प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमण करुन राहणार्यांपैकी एकाने तक्रारकर्ते यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे तक्रारकर्त्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणात तक्रारकर्ता यांना त्यांच्या विरुध्दच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्याकरीता महिला पोलिस हवलदार संगीता वाघमारे यांनी लाच मागितली. त्यावर तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या विभागाने तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा वाघमारे यांनी तक्रारकर्ता यांना पंचासमक्ष पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हे निष्पन्न झाले. त्याआधारे या पथकाने पाथरी येथील ओंकार नगर भागातील सुविधा मार्ट या मॉल मद्ये महिला पोलिस कर्मचार्यास तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. या प्रकरणात या विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, मोहम्मद झिब्राहील व कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.