World Yoga Day : राज्यातील २ हजार ६५५ अमृत सरोवरस्थळी जागतिक योग दिवस  | पुढारी

World Yoga Day : राज्यातील २ हजार ६५५ अमृत सरोवरस्थळी जागतिक योग दिवस 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली. या संकल्पनेंतर्गत राज्यात २ हजार ६५५ अमृत सरोवर निर्माण झाले आहे. या अमृत सरोवरांस्थळी बुधवार  २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. (World Yoga Day)
प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनो) सर्वसाधारण सभेत दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार २१ जून हा जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे भारतीय योग पध्दती जागतिक स्तरावर पोहचण्यास मदत झाली आहे.
जागतिक योग दिवस संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केंद्र शासनाने केले आहे. यावर्षीची थीम ‘वसुधैव कुटूंबकम’ आहे. जिल्हा स्तरावरुन नियंत्रण ठेवण्यात येणार असून प्रत्येक गावाच्या शाळेतील योग व क्रीडा शिक्षकांच्या मदतीने आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सभासद, भजन मंडळ, ग्रामसेवक, गाव परिसरातील नागरिकांच्या सहभागाने योगदिन साजरा केला जाणार आहे.

Back to top button