कसोटी क्रिकेटमध्ये बाबर आझमची कमाल, विराट-स्मिथला टाकले मागे, सचिनपेक्षाही सरस रेकॉर्ड | पुढारी

कसोटी क्रिकेटमध्ये बाबर आझमची कमाल, विराट-स्मिथला टाकले मागे, सचिनपेक्षाही सरस रेकॉर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना किमान 15 डाव खेळल्यानंतर त्याची फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम आहे. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. त्याचे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 20 डाव खेळल्यानंतर बाबरची सरासरी धावसंख्या 69.10 आहे. यादरम्यान त्याने आठ अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ३० डावात 55.40 च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने सहा अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. इंग्लडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने 34 डावांत 54.20 सरासरीने स्मिथच्या मागे आहे. रूटने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये सहा अर्धशतके आणि सहा शतके झळकावली होती.

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज 16 डावात 48.40 च्या सरासरीने चौथ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यूजने मागील 16 डावांमध्ये दोन अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याची 27 डावात 34.65 ची फलंदाजीची सरासरी आहे. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

गेल्या महिन्यात बाबर आझमने पाकिस्तानचा कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार बनणे चांगलेच असेल, असे त्याने आयसीसीच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. विश्वचषकावर लक्ष केंद्रित करून, बाबर कोलंबो स्ट्रायकर्ससाठी लंका प्रीमियर लीगमध्ये देखील सहभागी होणार आहे.

कोलंबो स्ट्रायकर्सच्या प्रेस रिलीझनुसार, स्ट्रायकर्सने आधीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि श्रीलंकेच्या टी-20 स्टार मथिषा पाथिराना आणि चमिका करुणारत्ने यांना लंका प्रीमियर लीग 2023 साठी त्यांच्या संघात स्थान दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button