India Tours West Indies : टीम इंडियात बदलाचे वारे; वेस्ट इंडिज दौर्‍यात ज्येष्ठांना मिळणार नारळ | पुढारी

India Tours West Indies : टीम इंडियात बदलाचे वारे; वेस्ट इंडिज दौर्‍यात ज्येष्ठांना मिळणार नारळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसत आहे. काही जुन्यांना नारळ देऊन नव्या खेळाडूंना संघात घेतले जाईल. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात कसोटीचा 80 टक्के संघ बदलला जाण्याची शक्यता आहे. (India Tours West Indies )

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला आणि लगेचच बीसीसीआयने टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर केला. यासह टीम इंडियाचा नव्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामाला सुरुवात होईल. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलै ते 13 ऑगस्ट या काळात होणार आहे. यात 2 कसोटी, 3 वन डे आणि 5 टी-20 मॅचेस होणार आहेत. भारतीय संघातील बिग फोर अर्थात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळले जाऊ शकते. कमीत कमी यातील दोघांना तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. जर असे झाले तर फायनलमधील 80 टक्के टीम इंडिया बदलेल. भारतात मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडू आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक जण वाट पाहत आहे. (India Tours West Indies)

वेस्ट इंडिज दौर्‍यात सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, अभिमन्यू ईश्वरन, जितेश शर्मा, प्रियांक पांचाल, बाबा इंद्रजित या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या बरोबर हनुमा विहारीला देखील स्थान मिळू शकते. काही खेळाडू दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत, त्यापैकी ऋषभ पंत, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांचादेखील फिटनेसवर विचार केला जाईल.

भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक म्हणाला, ‘संघातील ज्या खेळाडूंचे वय 30 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांच्या समावेशाबाबत विचार केला जाऊ शकतो. याचा निर्णय कोच राहुल द्रविड यांना घ्यावा लागणार आहे. काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यात यशस्वी, सरफराज आणि मुकेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे.’ (India Tours West Indies)

मर्यादित षटकांच्या संघातही होणार बदल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ आगामी वन डे वर्ल्डकप व पुढच्या वर्षी होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे आता भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातही फेरबदल होताना दिसणार आहेत. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या वन डे वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ पूर्णपणे बदललेला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. बीसीसीआयने टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याच्या खांद्यावर सोपवून त्या दिशेने वाटचाल केली आहे.

2021 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सुपर 12 स्टेजमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता, तर 2022 मध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवले गेले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना या फॉरमॅटपासून दूर ठेवले गेले आहे. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यावरही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिज दौर्‍यावरील टी-20 मालिकेसाठी रिंकू सिंग, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या सर्वांनी आयपीएल 2023 स्पर्धा गाजवली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकूने 149.52 स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. जितेशने पंजाब किंग्जकडून 156.06 स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहे. ऋतुराजनेही सातत्यपूर्ण कामगिरी करताना सीएसकेकडून सर्वाधिक 625 धावा केल्या आहे. त्यात पाच अर्धशतके व 1 शतक झळकावले आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालनेही यंदाची आयपीएल गाजवली आहे.

सपोर्ट स्टाफही टार्गेटवर

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर बीसीसीआय आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. विंडीज दौर्‍यात खेळाडूंमध्ये मोेठे फेरबदल पहावायस मिळतीलच, पण त्याचबरोबर सपोर्ट स्टाफला वॉर्निंग मिळणार आहे.

आयसीसी स्पर्धांमधील अपयशानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट टीमच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांना वॉर्निंग देण्यात येण्याचे संकेत आहेत. यामध्ये फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड व गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पदाला 2023 च्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत काहीच धोका नसला तरी, बीसीसीआय त्यांची स्पर्धेनंतर उचलबांगडी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्वांची हकालपट्टी होईल, अशी तरी सध्या परिस्थिती नाही; परंतु बीसीसीआयने आगामी वन डे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून राठोड व म्हाम्ब्रे यांच्याशी चर्चा केली आहे. वर्ल्डकपला अद्याप 4 महिने शिल्लक आहेत.

फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या आघाडीच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आल्याचे पाहायला मिळतेय. भरत अरुण यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हाम्ब्रे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी काही चांगली कामगिरी केली. त्यात त्यांच्या कार्यकाळात दुखापतीचे सत्रही वाढले.

भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ :

  • मुख्य प्रशिक्षक : राहुल द्रविड
  • फलंदाज प्रशिक्षक : विक्रम राठोड
  • गोलंदाज प्रशिक्षक : पारस म्हाम्ब्रे
  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक : टी दिलीप

‘हे इतके सोपे नाही. या सर्वांची कामगिरी खराब झालीय, असे आपण म्हणू शकत नाही. आम्ही भारतात विजय मिळवले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलो, ही सोपी गोष्ट नाही. पण, परदेशातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. चार महिन्यांवर वर्ल्डकप स्पर्धा आली आहे आणि त्यामुळे आता चूक करून चालणार नाही. त्यासाठी या सर्वांशी चर्चा मात्र नक्की केली जाईल,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाईड स्पोर्टस्ला सांगितले.

हेही वाचा;

Back to top button