Ind vs Pak : भारतीय संघ निवडीबाबत विराट कोहली म्‍हणाला… | पुढारी

Ind vs Pak : भारतीय संघ निवडीबाबत विराट कोहली म्‍हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

टी-20 क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील सुपर-12चा थरार आजपासून सुरु होत आहे. या स्‍पर्धेतील सर्वात हाय होल्‍टेज भारत -पाकिस्‍तान
( Ind vs Pak : ) सामना  उद्‍या (दि.२४) होणार आहे. या सामन्‍याकडे देशवासियांच्‍या लक्ष वेधले असतानाचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने उद्‍याच्‍या सामन्‍याबाबत महत्‍वपूर्ण विधान केले आहे.

व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराट म्‍हणाला की, पाकिस्‍तानविरोधातील सामन्‍यासाठी भारतीय संघ सज्‍ज आहे. मात्र या सामन्‍यात ११ खेळाडू कोण असतील, याबाबत आम्‍ही अद्‍याप निर्णय घेतलेला नाही. ( Ind vs Pak : ) हार्दिक पांड्या अद्‍याप पूर्णपणे फिट नाही. मात्र त्‍याचा फिटनेस सुधारत आहे. या स्‍पर्धेत तो संघातील दोन षटके टाकेल, असा विश्‍वास वाटतो. तो गोलंदाजीचा निर्णय घेईल. तोपर्यंत आम्‍ही स्‍थिती संभाळू शकतो. त्‍याचबरोबर हार्दिक हा सहाव्‍या क्रमांकासाठी महत्‍वपूर्ण फलंदाज आहे. त्‍याच्‍याबरोबरच आम्‍ही अन्‍य पयार्यांवरही विचार करत आहोत, असेही विराटने स्‍पष्‍ट केले.

पाकिस्‍तानविरोधातील सामन्‍यात संघ संतुलित असावा, असा आमचा प्रयत्‍न असेल. मात्र उद्‍याच्‍या सामन्‍यात कोण खेळणार हे आताच सांगू शकत नाही. मात्र आमचा संघ हा संतुलित असेल, असेही त्‍याने नमूद केले. कोणत्‍याही सामन्‍यापूर्वी आम्‍ही नियोजन आणि तयारी करुनच मैदानात उतरत असतो. आम्‍हाला आमच्‍या गोलंदाजावर पूर्ण विश्‍वास आहे. आमच्‍या संघात सर्व खेळाडू आपली जबाबदारी योग्‍यरित्‍या संभाळत आहेत. अत्‍यंत नियोजनबद्‍धरीत्‍या ते आपला खेळ करत आहेत, असेही ताे म्‍हणाला.

तुमच्‍या विचारामध्‍ये स्‍पष्‍टता असणे खूप महत्‍वाचे आहे. आजची क्रिकेटचा सामना हा तीन ते चार चेंडूमध्‍ये बदलू शकतो. एका गोलंदाजाला जर चौकार बसला यानंतर तो कशाप्रकारे आपला खेळ करतो, हे खूपच महत्‍वपूर्ण ठरते. आयपीएल सामन्‍यांमध्‍ये केलेल्‍या तयारीचा आम्‍हाला खूप फायदा होत आहे. टी-२० सामन्‍यामध्‍ये काही चेंडूमध्‍ये संपूर्ण सामन्‍याचा निकाल बदलू शकतो. त्‍यामुळे सामन्‍यापूर्वीचे नियोजन खूप महत्‍वपूर्ण ठरते, असेही विराटने नमूद केले.

 Ind vs Pak : यापूर्वीच्‍या कामगिरीवर चर्चा करत नाही

विश्‍वचषक स्‍पर्धेमध्‍ये पाकिस्‍तानविरोधातील सामन्‍यात भारत आतापर्यंत अजिंक्‍य राहिला आहे. विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या इतिहासाचा विचार करता एक दिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात सात सामने झाले. तर टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत पाच सामने झाले आहेत. सर्व सामन्‍यांमध्‍ये भारताने पाकिस्‍तानचा पराभव केला आहे. यासंदर्भात बोलताना विराट म्‍हणाला की, आम्‍ही यापूर्वी कशी कामगिरी केली यावर आम्‍ही कधीच चर्चा करत नाही. यामुळे खेळाकडे दुर्लक्ष होण्‍याची भीती असते. यापूर्वीच्‍या सामन्‍यांमध्‍ये आम्‍ही चांगला खेळ केल्‍यामुळेच आम्‍ही जिंकू शकलो. तुम्‍ही केवळ विक्रमाचीच चर्चा केली तर याचा खेळाडूंवर केवळ दबाव निर्माण होतो, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button