WTC Final 2023 : ओव्हलचा इतिहास काय सांगतो... | पुढारी

WTC Final 2023 : ओव्हलचा इतिहास काय सांगतो...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या, 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू होत आहे. द ओव्हल मैदानावर होणारी ही लढत चुरशीची होईल, अशी आशा आहे. या मैदानाची ओळख ओव्हल अशी असली, तरी त्याचे खरे नाव केनिंग्टन ओव्हलला असे आहे. मॅचच्या आधी जाणून घेऊयात आजवर झालेल्या सामन्यांतील आकडेवारी काय सांगते… (WTC Final 2023)

ओव्हल हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे क्रिकेट मैदान आहे. येथे आतापर्यर्ंत 104 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडमध्ये जूनपासून उन्हाळा सुरू होतो. या हंगामाचा शेवट म्हणजे सप्टेंबर महिना; पण या मैदानावर जून महिन्यात पहिल्यांदाच कसोटी खेळवण्यात येत आहे. शेवटच्या सहा वषार्र्ंचा (2016 पासून) विचार केला, तर संघाची सरासरी धावसंख्या एका विलक्षण नमुन्याने चढती आहे. (WTC Final 2023)

येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 269 इतकी आहे. दुसर्‍या डावात ही सरासरी 280 पर्यंत गेली आहे, तर तिसर्‍या डावात ही सरासरी वाढून 326 इतकी झाली आहे. दिवसाप्रमाणे फलंदाजांची सरासरी पाहिली, तर पहिल्या दिवशी 28.26, दुसर्‍या दिवशी 31.70, तर तिसर्‍या दिवशी 32.18 अशी वाढत गेली आहे. याचाच अर्थ कसोटी सामना जसजसा पुढे जाईल तशी ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरत गेली आहे. (WTC Final 2023)

ओव्हलवरील शेवटचे चार सामने हे उन्हाळ्याच्या शेवटी सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आले आहेत. गेल्या 30 वर्षांचा विचार करता फक्त दोन (2012 आणि 2017) कसोटी सामने ऑगस्टमध्ये खेळवण्यात आले आहेत. 2023 मध्ये ओव्हलवर खेळवण्यात आलेल्या तीन चॅम्पियनशिप सामन्यांत होम टीम असलेल्या सरे संघाने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही वेळेला सरे संघाने दुसर्‍यांदा फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे, तिन्ही सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी 90 विकेटस् घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन फलंदाजी जोमात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या आवृत्तीत्त फलंदाजीचा विचार करता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. त्यांचे टॉपचे सहा फलंदाज 46.07 अशी सरासरी दर्शवतात. उस्मान ख्वाजा हा यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 1,609 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 69.91 इतकी आहे. यात त्याने जगातील वेगवेगळ्या देशांत सहा शतके फटकावली आहेत. मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी हजाराच्या पुढे धावा केल्या असून, त्यांची सरासरीही पन्नासपेक्षा जास्त आहे. फक्त हेडचा विचार केला, तर त्याने प्रत्येक शंभर चेंडूंमागे 80 धावा फटकावल्या आहेत.

भारतीय फलंदाज सहाव्या क्रमांकावर

‘डब्ल्यूटीसी’च्या दुसर्‍या सत्रात भारतीय फलंदाजी सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीयांची धावांची सरासरी 33.74 इतकी आहे. विशेष म्हणजे, या सत्रात एकाही भारतीयाला हजाराचा आकडा गाठता आलेला नाही. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे भारताचे तीन दिग्गज गेल्यावर्षी लाल चेंडूवर धावांसाठी संघर्ष करताना दिसले. अर्थात, भारताने आपले सामने मायदेशात खेळले जे अतिशय कमी धावसंख्येचे झाले, हे एक कारण त्या गोष्टीसाठी लागू पडते. शिवाय, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना काही काळ संघातून वगळण्यात आले होते, त्यामुळे त्यांची सरासरी कमी दिसते.

अ‍ॅडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 36 धावांत खुर्दा केला होता. त्यावेळी भारतीय संघात एकही डावखुरा फलंदाज नव्हता. ज्यामुळे कांगारू गोलंदाजांची लेग्थ बिघडली नाही आणि त्यांना एका टप्प्यावर गोलंदाजी करता आली. पुढच्या कसोटीत ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा संघात आल्यावर चित्र एकदम बदलले आणि पहिल्या कसोटीत 8 विकेटस्नी मार खाणार्‍या भारताने दुसर्‍या कसोटीत 8 विकेटस्नीच विजय मिळवला.

यंदाही भारताच्या संभाव्य संघात रवींद्र जडेजा हा एकमेव डावखुरा फलंदाज दिसत आहे. पुजारा, कोहली आणि रहाणे या उजव्या हाताच्या मधल्या फळीत एक डावखुरा हवा म्हणून ईशान किशनला संधी मिळू शकते. परंतु, इतक्या मोठ्या स्टेजवर ईशानला परफॉर्म करू देण्याची रिस्क भारत घेईल का, हा प्रश्न आहे.

ओव्हल मैदानाचे रेकॉर्ड :

  • एकूण मॅच : 104
  • होम टीम (इंग्लंड) चा विजय : 43 वेळा
  • प्रथम फलंदाजी करून विजय : 37 वेळा
  • पाहुण्या संघाचा विजय : 23 वेळा
  • ड्रॉ मॅच : 37
  • सर्वोच्च धावसंख्या : 1938 इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 903
  • कमी धावसंख्या : ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड 44 धावांवर ऑलआऊट

कसे असेल खेळपट्टीचे स्वरूप?

द ओव्हल मैदानाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आहे. हे मैदान सर्वाधिक कसोटी सामने झालेल्या मैदानांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये येते. असे असले तरी येथील पिचबाबत कोणताही अंदाज लावता येत नाही. पिचवर गवत दिसत असल्याने असा अंदाज लावला जात आहे की, सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळेल. इंग्लंडमध्ये हवामान नेहमी बदलत राहते. त्यामुळेच पिचवर गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांना मदत मिळत राहते. यामुळेच टॉस जिंकणे निर्णायक ठरते.

मॅचच्या अखेरच्या दोन दिवशी पिच कोरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. याआधीच्या कसोटीत असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच अधिकतर संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा पर्याय निवडतात.

खेळपट्टी की ग्रीन कार्पेट?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल गवताने भरलेल्या हिरव्यागार खेळपट्टीवर होणार आहे. खेळपट्टी इतकी हिरवीगार आहे की, ती खेळपट्टी आहे की, मैदानाचा कुठला तरी हे भाग समजत नाही. ही खेळपट्टी पाहून फलंदाजांना फार आनंद झाला नसेल; पण दुसरीकडे वेगवान गोलंदाजांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. ढगाळ वातावरणात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी सोन्यापेक्षा कमी नाही. येथे चेंडू जोरदार स्विंग होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा;

Back to top button