Asia Cup 2023 : पाकिस्तान तोंडावर आपटणार? | पुढारी

Asia Cup 2023 : पाकिस्तान तोंडावर आपटणार?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया कप 2023 च्या आयोजनाचा मुद्दा अजून काही सुटलेला नाही. भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने हायब्रीड मॉडेल सादर केले होते. सुरुवातीला पाकिस्तानमधील काही वृत्तसंस्थांनी या मॉडेलला श्रीलंका आणि अफगाणिस्तानने पाठिंबा दिल्याचे वृत्त दिले होते. मात्र, आता हळूहळू श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी पाकिस्तानचे हे हायब्रीड मॉडेल मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर आपटण्याची नामुष्की आली असून, त्यांना आता नाक मुठीत धरून स्पर्धेत सहभागी होणे किंवा स्पर्धेवर बहिष्कार घालणे हे दोनच पर्याय उरले आहेत. (Asia Cup 2023)

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, बांगला देश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव नाकारला आहे. आता आशिया कप हा त्रयस्थ ठिकाणीच होणार आहे. आशिया कप हा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय हे आशिया कप पाकिस्तानमधून दुसरीकडे हलवण्यासाठी आग्रही होते. (Asia Cup 2023)

पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलला सुरुवातीला काही देशांनी पाठिंबा दिला होता. मात्र, बीसीसीआय सचिव जय शहा जे एशियन क्रिकेट कौन्सिलचेदेखील प्रमुख आहेत त्यांनी पीसीबीचे हे हायब्रीड मॉडेल नाकारले. त्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणार्‍या एकेका देशांनी पलटी मारण्यास सुरुवात केली.

हायब्रीड मॉडेलच्या बाजूचे देश विरोधात जाऊ लागल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा श्रीलंकेतील वन-डे मालिका रद्द करण्याची धमकी दिली. मात्र, तरीदेखील पाकिस्तान एकटा पडत गेला. आता बांगला देश आणि अफगाणिस्तानदेखील पलटले आहेत.

यापूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले होते की, पाकिस्तानमध्ये आशिया कप आयोजित करण्याची शक्यता जवळपास नाहीये. अधिकारी म्हणाला होता की, पाकिस्तान आशिया कप आयोजित करण्याची शून्य शक्यता आहे. आम्ही हा विषय आयसीसीकडेदेखील नेला आहे, जेणेकरून चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील पाकिस्तानमधून हलवली जावी. सध्या तरी श्रीलंका आशिया कप आयोजित करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा शेवटचा निर्णय हा एशियन क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल.

पाकिस्तानने बहिष्कार घातला तर…

आशिया चषक पाकिस्तानमध्ये नाही झाला, तर आम्ही त्या स्पर्धेवर बहिष्कार टाकू, अशी धमकी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी वारंवार दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान खरेच सहभागी नाही झाला, तर उर्वरित देश आशिया चषक स्पर्धेत खेळतील; पण प्रायोजक कंपन्या आणि ब्रॉडकॉस्टर याला तयार होणार नाहीत. कारण, भारत-पाक सामने होतील या आशेवरच त्यांनी स्पर्धेसाठी पैसा लावला आहे. त्यामुळे आशिया क्रिकेट कौन्सिलवरही दबाव आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा भारत, बांगला देश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या चार देशांच्या सहभागात होईल. परंतु, त्याला आशिया चषक न म्हणता चौरंगी क्रिकेट स्पर्धा म्हटले जाईल.

हेही वाचा;

Back to top button