HDFC Employee : एचडीएफसी बँक अधिकाऱ्याची चक्क ऑनलाईन मीटिंगमध्ये शिवीगाळ; संस्थेकडून निलंबित | पुढारी

HDFC Employee : एचडीएफसी बँक अधिकाऱ्याची चक्क ऑनलाईन मीटिंगमध्ये शिवीगाळ; संस्थेकडून निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : एचडीएफसी बँकेने एका अधिकाऱ्याला ऑनलाईन बैठकीदरम्यान सहकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 5 जून रोजी कोलकाता येथे ही बैठक सुरु होती. ट्विटरवर याबाबतची एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्याचे असभ्य वर्तन दिसून येत आहे. (HDFC Employee)

एचडीएफसी बँक अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत एचडीएफसी बँकेने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत असून बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिकाऱ्याच्या वर्तनाचा आढावा घेऊन बँक निर्णय घेईल.  (HDFC Employee)

व्हिडिओत बँक अधिकारी ओरडतो सहकर्मचाऱ्यांवर | HDFC Employee

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना दररोज 75 विमा पॉलिसी विकण्यास सांगत आहे. यावेळी हा अधिकारी सहकाऱ्यावर ओरडत असल्याचे दिसून येते. बँकिंग आणि विमा उत्पादने विकू शकत नसल्यामुळे, हा अधिकारी संताप व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

सहसा बँका त्यांच्या सहयोगी कंपन्यांची विमा उत्पादने त्यांच्या ग्राहकांना विकून कमावतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांना आजकाल थर्ड पार्टीच्या उत्पादनांच्या विक्रीच्या बाबतीत उच्च व्यवस्थापनाकडून खूप दबावाचा सामना करावा लागत आहे. असे टार्गेट चुकवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. जर एखादा कर्मचारी अशा उत्पादनांची विक्री करण्यात यशस्वी झाला तर त्याला अनेक प्रकारचे लाभ दिले जातात.

गेल्या महिन्यातच, भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व PSU बँकांच्या संचालक मंडळासोबत बैठक घेतली आणि प्रशासन आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर चर्चा केली. आर्थिक उत्पादनांच्या चुकीच्या विक्रीच्या बाबतीत, अर्थमंत्र्यांनी PSU बँकांच्या सर्व प्रमुखांना योग्य मार्ग शोधण्याचा आणि लोकांना चुकीच्या उत्पादनांची विक्री टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा

Back to top button