

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. गेल्या 10 वर्षांतील एक किंवा दोन स्पर्धा वगळता, भारत प्रत्येक वेळी नॉकआऊटमध्ये पोहोचला आहे, परंतु पुन्हा विजेतेपद जिंकू शकला नाही; पण यावेळी एक गोष्ट विशेष आहे, जी यापूर्वीच्या कोणत्याही स्पर्धेत घडलेली नाही. (WTC Final 2023)
रोहित शर्मा प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून रोहितने कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना एकदाही गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येक वेळी संघाने जेतेपद पटकावले आहे. चॅम्पियन्स लीगमध्येही मुंबईचे कर्णधार असताना रोहितने एकदा विजेतेपद पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज कर्णधाराला त्याने तीनवेळा पराभूत केले आहे. (WTC Final 2023)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही फायनल जिंकता आलेली नाही. मात्र, विराटने विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद मिळाले तेव्हा टीम इंडियाने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने 2018 मध्ये निदाहास ट्रॉफी जिंकली होती. आशिया कप 2018 मध्येही रोहित शर्मा भारताचा कर्णधार होता. सर्वात रोमांचक बाब म्हणजे दोन्ही सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. आयपीएलमध्येही मुंबईने शेवटच्या चेंडूवर दोनदा विजय मिळवला आहे. म्हणजे नशीबही रोहित शर्माच्या बाजूने असते असे म्हणता येईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली तर ती त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ट्रॉफी असेल. त्यामुळे भारतीय संघाचा दुष्काळही संपणार आहे. (WTC Final 2023)
भारताला गेल्या 10 वर्षार्ंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीने भारताला थोडक्यात हुलकावणी दिली आहे. याचे दडपण भारतीय संघावर असणार आहे.
दुसरीकडे मोठ्या ब्रेकनंतर ऑस्ट्रेलिया कसोटी सामना खेळत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभवाची धूळ चारली आहे. नुकत्याच भारतात झालेल्या मालिकेतदेखील ऑस्ट्रेलिया भारताकडून पराभूत झाला. यामुळे त्यांच्यावरही दबाव असणार आहे.
इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांची चांदी असते. त्यात जर ड्यूक बॉल हातात मिळाला, तर त्यांचा आत्मविश्वास तर आकाशाला टेकलेला असतो. मात्र, हाच ड्यूक बॉल आणि त्याचा तो भला मोठा स्विंग हा विकेटकिपर आणि स्लीपमध्ये फिल्डिंग करणार्या खेळाडूंसाठी मोठी डोकेदुखी ठरतो.
हेही वाचा;