French Open : स्वायटेक, रूड, रिबाकिना तिसर्‍या फेरीत | पुढारी

French Open : स्वायटेक, रूड, रिबाकिना तिसर्‍या फेरीत

पॅरिस; वृत्तसंस्था : विद्यमान विजेती इगा स्वायटेक, कॅस्पर रूड, रिबाकिना आदी खेळाडूंनी येथील फ्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत आगेकूच केली. स्वायटेकला अमेरिकेच्या क्लॅरे लियूविरुद्ध 6-4, 6-0 अशा फरकाने विजय मिळवता आला असला तरी प्रारंभी बरेच झगडावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित असलेल्या स्वायटेकचा येथे चार वर्षांत तिसर्‍यांदा जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. (French Open)

स्वायटेकने प्रारंभी जोरदार सुरुवात केली. पोलंडच्या या दिग्गज खेळाडूने लियूचे आव्हान नंतर एकतर्फी फरकाने संपुष्टात आणले. लियूने पहिल्या सेटच्या प्रारंभिक टप्प्यात जोरदार संघर्ष साकारला. पण, नंतर अचानक तिचा सूर हरवला. यानंतर स्वायटेकने एककलमी वर्चस्व गाजवत हा सामना सहज फरकाने खिशात टाकला. (French Open)

क्ले कोर्टवर खेळत असताना संयम अतिशय महत्त्वाचा असतो, असे स्वायटेक या विजयानंतर म्हणाली. आता पुढील फेरीत तिची लढत चीनच्या वँग क्झिन्यूविरुद्ध होणार आहे. अन्य लढतीत रिबाकिनाने नोस्कोव्हाचे आव्हान मोडीत काढत तिसर्‍या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चौथी मानांकित रिबाकिना येथे 6-3, 6-3 अशा फरकाने विजयी ठरली. तिची झेक प्रतिस्पर्धी लिंडा नोस्कोव्हाने संघर्षमय खेळावर भर दिला. पण, नंतर ती यात अपयशी ठरली. इगा स्वायटेक व द्वितीय मानांकित आर्यना सबालेंका यांच्यासह रिबाकिना ही देखील महिला एकेरीतील बिग थ—ी खेळाडूंपैकी एक मानली जाते. अमेरिकेच्या कोको गॉफने ज्युलियर ग्रॅबरला 6-2, 6-3 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. गॉफ सध्याच्या मानांकनात सहाव्या स्थानी आहे.

रूडची झेपियरीवर एकतर्फी मात

गतवर्षातील उपविजेता कॅस्पर रूडने पुरुष एकेरीत इटालियन क्वालिफायर ग्युलियो झेपियरीवर 6-3, 6-2, 4-6, 7-5 अशा फरकाने पराभूत करत तिसरी फेरी गाठली. नॉर्वेच्या या अव्वल खेळाडूने आपल्या कामगिरीत सातत्य राखत झेपियरचे आव्हान सहज मोडीत काढले.

जन्निक सिन्नरला दोन मॅच पॉईंट गमावल्याचा फटका बसला. जर्मनीच्या डॅनिएल अ‍ॅल्टमेरयने त्याला 6-7 (0), 7-6 (7), 1-6, 7-6 (4), 7-5 अशा फरकाने मात दिली. अलेक्झांडर झेरेव्हने स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलेक्स मॉल्कनला 6-4, 6-2, 6-1 अशा फरकाने मात दिली. 22 व्या मानांकित झेरेव्हची पुढील लढत अमेरिकेच्या 12 व्या मानांकित फ्रान्सेस टॅफोविरुद्ध होणार आहे. टॅफोने रशियन क्वालिफायर अस्लन कॅरात्सेव्हवर 3-6, 6-3, 7-5, 6-2 असा विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button