Ronaldo : सौदी लीगसाठी रोनाल्डोची अन्य स्टार खेळाडूंनाही हाक! | पुढारी

Ronaldo : सौदी लीगसाठी रोनाल्डोची अन्य स्टार खेळाडूंनाही हाक!

रियाध; वृत्तसंस्था : यंदाच्या हंगामात रिकाम्या हाताने परतावे लागेल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, तरीही मी सौदी अरेबियन क्लबतर्फे खेळताना बेहद्द खूश आहे, येथे खेळण्याचा आनंद लुटत आहे आणि अन्य स्टार खेळाडूंनीदेखील पुढील हंगामासाठी सौदी अरेबियन लीगलाच प्रथम पसंती द्यावी, असे थेट आवाहन पोर्तुगीज सुपरस्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले आहे. रोनाल्डोने जानेवारीत सौदी अरेबियातील अल नासर संघाशी दोन वर्षांचा करार केला असून, या कालावधीत त्याने 16 सामन्यांत 14 गोल नोंदवले. मात्र, यानंतरही त्याची ही कामगिरी संघाला सौदी प्रो लीग जेतेपद मिळवून देऊ शकली नाही. अल नासरचा संघ अल इतिहादनंतर दुसर्‍या स्थानी राहिला. (Ronaldo)

38 वर्षीय रोनाल्डोला दुखापतीमुळे हंगामातील शेवटचा सामना खेळता आला नव्हता. सौदी लीग अतिशय व्यावसायिक पद्धतीने खेळवली गेली. पण, यात अद्यापही व्यावसायिक खेळाडूंना बराच वाव आहे, असे निरीक्षण त्याने नोंदवले. संघातील अनेक संघ उत्तम आहेत. अरब खेळाडूही सरस आहेत. पण, पायाभूत सोयीसुविधांचा दर्जा वाढणे आवश्यक आहे. रेफ्री व्हीएआर सिस्टीम अधिक तत्पर होणे आवश्यक आहे. अर्थात, मी यानंतरही येथे खूश आहे आणि मी येथेच राहणार आहे, याचा रोनाल्डोने पुढे उल्लेख केला. (Ronaldo)

युरोपमध्ये व सौदी अरेबियात खेळताना बराच फरक पडतो. पण, या सर्वांशी जुळवून घेण्यावर मी भर दिला आणि याचमुळे मी येथे समरस होऊ शकलो. युरोपमध्ये आम्ही सकाळच्या सत्रात अधिक सराव करायचो आणि येथे दुपारच्या किंवा सायंकाळच्या सत्रात सराव करायचा असतो, असे तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. युरोपमध्ये रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड, इव्हेंटस् व रियल माद्रिद या संघांकडून खेळला आहे.

तसे पाहता, रोनाल्डो सौदी अरेबियात आल्यानंतर आणखी काही अव्वल खेळाडू सौदी लीगशी करारबद्ध होण्याच्या विचारात आहेत. लियोनेल मेस्सीला तर पुढील हंगामासाठी अल-हिलाल संघाने कराराची ऑफर दिली आहे. रोनाल्डोचा माजी संघ सहकारी व बॅलॉन ओडोर पुरस्कार विजेता करीम बेन्झेमाला देखील अल-इतिहादकडून ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रोनाल्डो म्हणाला, ‘आणखी दिग्गज खेळाडू येथे येत असतील तर त्यांचे स्वागतच असेल. युवा असतील किंवा ज्येष्ठ, दिग्गजांनी या लीगमध्ये खेळायला हवे. असे झाल्यास लीगचा दर्जा निश्चितपणाने सुधारेल. यात वयाने फारसा फरक पडत नाही.’

हेही वाचा;

 

Back to top button