WTC Final : मागील चुकांची पुनरावृत्ती करू नका | पुढारी

WTC Final : मागील चुकांची पुनरावृत्ती करू नका

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दोन वर्षांपूर्वी जुन्या मानसिकतेवर आधारित संघनिवड करण्याची जी चूक केली, त्याची पुनरावृत्ती यंदा भारताने अजिबात करू नये, असा स्पष्ट इशारा माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिला. दुखापतग्रस्त ऋषभ पंतची जागा भरून काढणे कठीण असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. (WTC Final)

यापूर्वी, 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा असे दोन फिरकीपटू खेळवले आणि साऊथहॅम्प्टनमधील त्या लढतीत खेळपट्टीने जलद गोलंदाजांना साथ दिल्याने याचा भारताला मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर, एमएसके प्रसाद बोलत होते. (WTC Final)

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदाची डब्ल्यूटीसी फायनल दि. 7 जूनपासून लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. या लढतीत त्यावेळी वातावरण कसे असेल, खेळपट्टी कोणत्या गोलंदाजांना पोषक ठरू शकते, यावर अंतिम संघनिवड करावी, अशी प्रसाद यांची सूचना आहे. ‘आपण त्यावेळी दोन फिरकीपटू व 3 जलद गोलंदाज खेळवण्यावर ठाम होतो. पण, पाऊस झाल्यानंतर या रणनीतीत बदल करणे आवश्यक होते. तसे झाले नाही. आपण आधी ठरलेले 11 खेळाडूच कायम ठेवले आणि याची मोठी किंमत मोजावी लागली. सध्या ओव्हलवर कशी परिस्थिती असेल, पाच दिवसांत वातावरण कसे बदलत राहील, याचा अंदाज वर्तवता येणार नाही. त्यामुळे, आताच संघनिवड निश्चित करून चालणार नाही,’ असे ते म्हणाले.

पंतऐवजी भरतला संधी देणे योग्य

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे शानदार शतके झळकावणारा ऋषभ पंत यंदाच्या फायनलसाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे, एखाद वेळेस आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर त्याचा काऊंटर अ‍ॅटॅकचा पर्याय नसेल. मात्र, पंतच्या गैरहजेरीत के.एस. भरत हा त्याची जागा समर्थपणे भरून काढू शकतो, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला. एमएसके प्रसाद 2016 ते 2020 या कालावधीत निवड समिती अध्यक्षपदी कार्यरत राहिले आहेत.

ओव्हलवर वापरला जाणार भारताच्या पसंतीचा ड्यूक चेंडू!

यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पसंतीचा ड्यूक चेंडू वापरला जाणार असल्याचे आता निश्चित केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ही लढत कुकाबुरा चेंडूवर खेळवली जाईल, असे म्हटले होते. मात्र, आता ड्यूक चेंडूवर शिक्कामोर्तब केले गेले आहे. एरवी, कुकाबुरा चेंडू ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये वापरला जातो तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व झिम्बाब्वे येथील सामनेही याच चेंडूवर खेळवले जातात. इंग्लंडमध्ये प्रारंभापासूनच ड्यूक चेंडू वापरला जात असून दोन वर्षांपूर्वीची डब्ल्यूटीसी फायनल या चेंडूवरच झाली होती. भारतात एरवी एसजी चेंडू वापरला जातो. मात्र, बुमराह, उमेश यादव या गोलंदाजांनी यापूर्वी ड्यूक चेंडूबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

काय आहेत ड्यूक चेंडूची वैशिष्ट्ये?

  • क्रिकेटमध्ये वापरला जाणारा हा सर्वात जुना चेंडू आहे.
  • कुकाबुरा व एसजी चेंडूच्या तुलनेत अधिक गडद रंग.
  • ड्यूक पूर्णपणे हाताने तयार केलेला असतो.
  • इंग्लिश वातावरणात हा चेंडू स्विंग गोलंदाजांना अधिक पोषक ठरतो.

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड सर्वात खराब

इंग्लंडमधील 140 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे सर्वात खराब रेकॉर्ड ओव्हल मैदानावर राहिले आहे. इंग्लंडमध्ये 1880 मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना ओव्हलवर खेळवला गेला होता. या मैदानावर ऑस्ट्रेलियाला आजवर केवळ 7 सामने जिंकता आले आहेत. ऑस्ट्रेलियाने इंग्लिश भूमीत लॉर्डस् मैदानावर सर्वाधिक यश मिळवले असून तेथे त्यांची विजयाची टक्केवारी 43.59 इतकी राहिली आहे.

ओव्हलवर भारतीय संघ फक्त 1971 व 2021 मध्ये विजयी

भारतीय संघाने ओव्हल मैदानावर आजवर केवळ दोनच सामने जिंकले आहेत. यातील पहिला विजय 1971 तर दुसरा विजय 2021 मधील राहिला आहे. मात्र, 2021 मध्ये भारताने यजमान इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी मोठा विजय नोंदवला होता, त्यामुळे ही भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरू शकेल.

हेही वाचा; 

Back to top button