WTC Final साठी मैदानात उतरणार ‘हे’ खेळाडू! अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11 | पुढारी

WTC Final साठी मैदानात उतरणार ‘हे’ खेळाडू! अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे काऊंटडाउन सुरू झाले आहे. 7 जून रोजी ओव्हलच्या मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन संघ भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त होते. नुकत्याच पार पडलेल्या या लिग स्पर्धेतील कामगिरीचा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 नक्कीच परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत कांगारूंविरुद्ध मैदानात उतरणा-या अंतिम 11 खेळाडूंच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित शर्मा-शुबमन गिल करणार डावाची सुरुवात

शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंगची जबाबदारी सांभाळताना दिसतील. शुबमनने आयपीएलच्या 16 व्या हंगामात सर्वाधिक 890 धावा चोपल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. त्याचवेळी कर्णधार रोहितचा फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे. मात्र, या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केल्याने ते डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात संघासाठी चांगली सुरुवात करून देतील अशी अपेक्षा आहे. (team india probable playing 11 for wtc final 2023 against australia)

पुजारा आणि कोहली मधल्या फळीत

चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. पुजारा बराच काळ काऊंटी खेळत आहे. त्याने ससेक्सचे कर्णधारपद भूषवले असून इंग्लंडच्या मैदानांवर त्याने शानदार खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून भारतीत संघाला खूप आशा आहे. त्याचवेळी संघाचा सर्वात मोठा स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरेल. आयपीएलमध्ये विराटची बॅट तळपली आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेचे पाचव्या क्रमांकावर उतरणे निश्चित आहे. रहाणेने नुकतेच देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करून सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. (team india probable playing 11 for wtc final 2023 against australia)

यष्टीरक्षक आणि अष्टपैलू यांच्या निवडीचा पेच

केएस भरत यष्टिरक्षक म्हणून मैदानात उतरेल. अलीकडेच त्याची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात निवड झाली होती. विकेटच्या मागे त्याने समाधानकारक कामगिरी केली पण फलंदाज म्हणून त्याने निराशा केली. त्यामुळे इशान किशनची देखील एक्स फॅक्टर म्हणून निवड केली जाऊ शकते. या दोघांच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा संघात फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. इंग्लिश खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाजांची गरज भासणार नाही, अशा स्थितीत रवी अश्विन आणि अक्षर पटेल यांना संधी मिळणे फार कठीण आहे.

तीन वेगवान गोलंदाजांना मिळेल स्थान

इंग्लंडच्या मैदानावर खेळताना तेथील वातावरणानुसार प्लेईंग 11 मध्ये तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव या तीन गोलंदाजांना संघात स्थान मिळू शकते. शमी आणि सिराज यांनीही आयपीएलमध्ये भेदक मारा करून अप्रतिम कामगिरी केली होती. उमेश यादवही डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी तंदुरुस्त झाला आहे.

WTC फायनलसाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

Back to top button