IPL 2023 : आयपीएलचे 10 सुपर फ्लॉप खेळाडू | पुढारी

IPL 2023 : आयपीएलचे 10 सुपर फ्लॉप खेळाडू

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील अनेक सुपरस्टार खेळाडू घडले. पण, याचवेळी काही खेळाडूंनी बरीच निराशा केली. पृथ्वी शॉ, दीपक हुडा व उमरान मलिकसारख्या खेळाडूंकडून बरीच अपेक्षा होती. पण, ती पूर्णपणे फोल ठरली. पंजाबचा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम कुरेन बराच झगडत राहिला. हरी ब्रुक देखील एका शतकाचा अपवाद वगळता झगडतच राहिला. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या हंगामातील 10 फ्लॉप खेळाडूंवर द़ृष्टिक्षेप…

पृथ्वी शॉ : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पृथ्वी शॉने या हंगामात 8 सामन्यांत एका अर्धशतकासह जेमतेम 106 धावा जमवल्या. त्याने आपल्या पहिल्या 6 सामन्यांत 46 धावा केल्या आणि या खराब कामगिरीमुळे त्याला पुढील काही सामन्यांतून वगळण्यात आले. शॉला शेवटच्या दोन सामन्यांत खेळवले गेले. शॉने पंजाबविरुद्ध 38 चेंडूंत 54 धावा केल्या. पण, चेन्नईविरुद्ध तो पुन्हा अपयशी ठरला.

मयंक अग्रवाल : सनरायजर्स हैदराबादतर्फे खेळत असताना कारकिर्दीला संजीवनी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अग्रवालसाठी 8.25 कोटी रुपये मोजले गेले होते. पण, अग्रवाल पूर्णपणे अपयशी ठरला. ब—ायन लाराचे प्रशिक्षण लाभत असलेल्या या संघाकडून अग्रवालला 10 डावात 270 धावांवर समाधान मानावे लागले. त्याने एकमेव अर्धशतक हैदराबादच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील शेवटच्या सामन्यात साजरे केले. त्या लढतीत मयंकने 46 चेंडूंत 83 धावांची आतषबाजी केली. पण, तोवर उशीर झाला होता.

दिनेश कार्तिक : एकवेळ उत्तम फिनिशर मानला गेलेला दिनेश कार्तिक या हंगामात चक्क चार वेळा शून्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये शून्यावर बाद होण्याचा विक्रम आता त्याच्या खात्यावर नोंदवला गेला आहे. आतापर्यंत तो 17 वेळा खातेही न उघडता बाद झाला आहे. आरसीबीच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाला यंदा 13 सामन्यांत 140 धावा जमवता आल्या. पुढे त्याला वगळून अनुज रावतला संधी देण्यात आली.

दीपक हुडा : लखनौ सुपर जायंटस्तर्फे खेळणार्‍या हुडाला यंदा 12 सामन्यांत जेमतेम 84 धावांवर समाधान मानावे लागले. यात आठवेळा एकेरी धावांचा समावेश राहिला. आश्चर्य म्हणजे या हंगामात तो तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीत उतरत होता.

हॅरी ब्रुक : इंग्लंडचे बॅटिंग सेन्सेशन मानल्या जाणार्‍या हॅरी ब्रुकला हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. पण, ब्रुक यंदा सपशेल अपयशी ठरला. केकेआरविरुद्ध 55 चेंडूंत 100 धावांच्या शानदार खेळीचा अपवाद वगळता ब्रुकला आपल्या पहिल्या हंगामात अजिबात करिष्मा दाखवता आला नाही. त्याने 11 डावांत 190 धावा केल्या.

सॅम कुरेन : पंजाबने 18.50 कोटी अशी भरभक्कम रक्कम मोजल्यानंतर सॅम कुरेन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण, येथे आयपीएलच्या व्यासपीठावर त्याला सातत्याने झगडत राहावे लागले. त्याची गोलंदाजी सर्वात निराशाजनक ठरली. त्याला 14 सामन्यांत केवळ 10 बळी घेता आले. फलंदाजीत त्याने एका अर्धशतकासह 276 धावा केल्या.

उमेश यादव : केकेआरच्या उमेश यादवला पहिल्या आठ सामन्यांत केवळ एकच विकेट घेता आली आणि त्यानंतर तो संघातून बाहेर फेकला गेला. उर्वरित सर्व लढतीत त्याला यामुळे राखीव खेळाडूंत बसावे लागले. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी अगदीच निराशाजनक ठरला.

जोफ्रा आर्चर : दुखापतीतून सावरत परतणार्‍या जोफ्रा आर्चरला आपला नेहमीचा भेदक मारा अजिबात साकारता आला नाही. बेल्जियममध्ये किरकोळ शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर त्याने काही सामन्यांत खेळण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. 5 सामने खेळल्यानंतर त्याला संघातून बाहेर व्हावे लागले. आर्चरने 5 सामन्यांत 9.50 च्या इकॉनॉमीने केवळ 2 विकेटस् घेतले.

कगिसो रबाडा : जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या रबाडाला यंदा आयपीएल स्पर्धेत अजिबात करिष्मा दाखवता आला नाही. पंजाबकडे विदेशी गोलंदाजांमध्ये अनेक उत्तम पर्याय असल्याने याचाही परिणाम झाला. रबाडाने केवळ 6 सामने खेळले. यात त्याला 7 बळी घेता आले. त्याचा इकॉनॉमी रेट 10 धावांच्या दरम्यान राहिला.

उमरान मलिक : गतवर्षी आयपीएल हंगामातील फाईंड ठरलेल्या उमरान मलिकला यंदा मात्र अजिबात सूर सापडला नाही. ब—ायन लाराच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या नव्या व्यवस्थापनाने त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही, हे देखील तितकेच कारणीभूत ठरले. उमरानने पहिल्या 4 सामन्यांत 5 बळी घेतले. पण, यादरम्यान तो बराच महागडा देखील ठरला.

हेही वाचा; 

Back to top button