Yashasvi Jaiswal IPL 2023 : 'यशस्वी' IPL मधील सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज; केएल राहुलचा मोडला विक्रम | पुढारी

Yashasvi Jaiswal IPL 2023 : 'यशस्वी' IPL मधील सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज; केएल राहुलचा मोडला विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या ५६ व्या­­ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा तो खेळाडू ठरला. त्याने अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक ठोकले. यशस्वीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा विक्रम मोडला आहे. राहुलने १४ चेंडूंत अर्धशतक केले आहे.

यशस्वी जैस्वालच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने केकेआरचा ४१ चेंडू व ९ गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. केकेआरला ८ बाद १४९ धावांवर रोखल्यानंत १३.१ षटकांत १ बाद १५१ धावांसह सर्व आघाड्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. विजयासाठी १५० धावांचे आव्हान असताना, जैस्वालने राणाच्या पहिल्याच षटकात २६ धावांची आतषबाजी करत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. पुढे त्याने १३ चेंडूंत अर्धशतक फलकावर लावले तर हाच धडाका नंतरही कायम ठेवत चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या या झंझावाती खेळीत १२ चौकार व ५ उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याने यादरम्यान २०८.५१ असा लक्षवेधी स्ट्राइक रेट नोंदवला. अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक फटकावल्यानंतर जैस्वाल आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.

राहुल आणि कमिन्स बरोबरीत

केएल राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना २०१८ मध्ये मोहाली येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक केले होते. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी खेळाडू पॅट कमिन्सनेही १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध, त्याने कोलकात्यासाठी १४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

राजस्थानने कोलकात्याची बरोबरी केली

नितीश राणाच्या पहिल्याच षटकात यशस्वीने २६ धावा केल्याने राजस्थानने आयपीएलमध्ये एक रेकॉर्ड केला आहे. पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा संघ ठरला आहे. या बाबतीत त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली. कोलकाताने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ईडन गार्डन्सवरच २६ धावा केल्या होत्या. एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर आहे. त्यांनी २०११ मध्ये चेन्नई येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ धावा केल्या होत्या. त्यात सात धावा अतिरिक्त मिळाल्या होत्या.

IPL मध्ये १००० धावा करणारा जैस्वाल दुसरा भारतीय युवा फलंदाज

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातील ५२ व्या सामन्यात जैस्वालने त्याच्या आयपीएल करिअरमधील एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. जैस्वाल या लीगमध्ये सर्वात कमी वय असताना एक हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात १ हजार धावा करण्याच्या यादीमध्ये ऋषभ पंत पहिल्या स्थानावर आहे. जैस्वालने पृथ्वी शॉला या कामगिरीत मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

हेही वाचा : 

Back to top button