KKR vs RR : राजस्थानचा ‘यशस्वी’ झंझावात! | पुढारी

KKR vs RR : राजस्थानचा ‘यशस्वी’ झंझावात!

कोलकाता; वृत्तसंस्था :  अवघ्या 13 चेंडूंत अर्धशतक फटकावल्यानंतर 47 चेंडूंत नाबाद 98 धावांची झंझावाती खेळी साकारणार्‍या यशस्वी जैस्वालच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने केकेआरचा 41 चेंडू व 9 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. केकेआरला 8 बाद 149 धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने 13.1 षटकांत 1 बाद 151 धावांसह सर्व आघाड्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. (KKR vs RR)

विजयासाठी 150 धावांचे आव्हान असताना, जैस्वालने राणाच्या पहिल्याच षटकात 26 धावांची आतषबाजी करत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. पुढे त्याने 13 चेंडूंत अर्धशतक फलकावर लावले तर हाच धडाका नंतरही कायम ठेवत चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या या झंझावाती खेळीत 12 चौकार व 5 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याने यादरम्यान 208.51 असा लक्षवेधी स्ट्राईक रेट नोंदवला.
कर्णधार जोस बटलर खाते उघडण्यापूर्वीच धावचीत झाल्याने राजस्थानला प्रारंभी मोठा धक्का बसला. पण, केकेआरसाठी हे या लढतीतील एकमेव यश ठरले. नंतर जैस्वाल व संजू सॅमसन यांनी 121 धावांची अभेद्य भागीदारी साकारत राजस्थानच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. (KKR vs RR)

तत्पूर्वी, वेंकटेश अय्यरच्या 42 चेंडूंतील 57 धावांच्या खेळीच्या बळावर केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 20 षटकांत 8 बाद 149 धावांची किरकोळ मजल गाठली. 57 धावा जमवणार्‍या वेंकटेश अय्यरच्या खेळीत 2 चौकार, 4 षटकारांचा समावेश राहिला. मात्र, त्याला एकाही फलंदाजाची समयोचित साथ लाभली नाही. कर्णधार नितीश राणाने 22 धावा केल्या तर गुरबाझने 18 धावांचे योगदान दिले. राजस्थानतर्फे यजुवेंद्र चहलने 25 धावांत 4 बळी घेतले.

या लढतीत राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला प्रथम फलंदाजीला पाचारण केले तर ठराविक अंतराने केकेआरचे गडी बाद होत राहिल्याने हा निर्णय सार्थही ठरला. जेसन रॉय (10) व गुरबाझ (18) हे दोन्ही सलामीवीर अतिशय स्वस्तात बाद झाल्याने एकवेळ त्यांची स्थिती 2 बाद 29 अशी झाली. त्यानंतर अय्यरने कर्णधार नितीश राणाच्या साथीने तिसर्‍या गड्यासाठी 48 धावा जोडल्या. राणा तिसर्‍या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी केकेआरने 10.2 षटकांत 77 धावांपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा; 

Back to top button