ISSF World Cup : दिव्या टीएस, सरबजोतला मिश्र गटात सुवर्ण | पुढारी

ISSF World Cup : दिव्या टीएस, सरबजोतला मिश्र गटात सुवर्ण

बाकू : भारताचे दिव्या टीएस व सरबजोत सिंग 10 मीटर्स एअर पिस्तोल मिश्र सांघिक गटातून आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरले. या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी दिव्या व सरबजोत या जोडीने 55-टीम क्वॉलिफिकेशनमध्ये 581 गुणांची कमाई करत किमान पदक निश्चित केले होते. त्यानंतर फायनलमध्ये आपली कामगिरी आणखी उंचावत या जोडीने सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. (ISSF World Cup)

दामिर मिकेस व झोराना अ‍ॅरुनोव्हिक या सर्बियन दिग्गजांविरुद्ध लढताना दिव्या व सरबजोत यांनी 16-14 अशा फरकाने निसटता विजय मिळवला आणि अव्वलस्थान काबीज केले. सरबजोतसाठी हे लागोपाठ स्पर्धांमध्ये सलग दुसरे आयएसएसएफ विश्वचषक सुवर्ण ठरले. त्याने यापूर्वी मार्चमध्ये भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तोल गटात अव्वल यश मिळवले होते. दिव्यासाठी मात्र वरिष्ठ स्तरावर हे पहिलेच पदक ठरले. तुर्कीच्या इस्माईल केलेस व सिमल यिल्मझ या जोडीने कांस्यपदक पटकावले. (ISSF World Cup)

पात्रता फेरीत दिव्या व सरबजोत यांना बराच संघर्ष करावा लागला. पात्रतेत तीन मिश्र सांघिक संघ संयुक्त 581 गुणांसह बरोबरीत होते. मात्र, भारतीय जोडीने इनर-10 चा 16 वेळा वेध घेतला असल्याने त्यांना आघाडीचे स्थान प्राप्त झाले. हाच धडाका त्यांनी अंतिम फेरीतही कायम राखत अव्वल स्थान मिळवले. दिवसभरातील पहिल्या इव्हेंटमध्ये 10 मीटर्स एअर रायफल मिश्र सांघिक सुुवर्णपदकासाठी चिनी संघातच स्पर्धा होती. यात हुआंग युतिंग व शेंग लिहाओ यांनी वँग झिलिन व यांग हाओरन यांना 16-14 अशा फरकाने नमवले. भारताच्या दोन्ही संघांना पदकच्या फेरीत पोहोचता आले नाही. झेक प्रजासत्ताकने कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेच्या पदकतालिकेत 1 सुवर्ण व 1 कांस्यपदकासह भारतीय संघ दुसर्‍या स्थानी राहिला असून चीन 1 सुवर्ण व 1 रौप्यपदकासह अव्वलस्थानी विराजमान आहे.

हेही वाचा;

Back to top button