IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘हे’ दोन संघ भिडणार?जाणून घ्या संपूर्ण समीकरण | पुढारी

IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘हे’ दोन संघ भिडणार?जाणून घ्या संपूर्ण समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत शानदार कामगिरी केली आहे. या विजयानंतर, चेन्नईचे 12 सामन्यांतून 15 गुण झाले असून ते गुणतालिकेत टॉप-2 मध्ये पोहचले आहेत. त्यानंतर असे काही आकडे समोर आले आहेत, जे पाहून सीएसके चाहते नक्कीच आनंदाने उड्या मारतील.

डीसीविरुद्धच्या विजयासह सीएसकेची पहिली क्वालिफायर खेळण्याची शक्यताही बऱ्यापैकी वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पहिली क्वालिफायर टेबल टॉपर असणा-या गुजरात टायटन्स आणि सीएसके यांच्यात खेळला जाऊ शकतो.

16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात जायंट्सकडे क्वालिफायर-1 खेळण्याची सर्वाधिक 92 टक्के शक्यता आहे. तर चेन्नई सुपर किंग्जची शक्यता 70 टक्के झाली आहे. या यादीत तिसरे नाव मुंबई इंडियन्सचे असले तरी त्यांच्यासाठी पहिली क्वालिफायर खेळणे खूप कठीण आहे. त्याची क्वालिफायर-1 खेळण्याची टक्केवारी फक्त 16 आहे.

समजून घेऊया संपूर्ण समीकरण…

गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 8 सामने जिंकले असून तीन गमावले आहेत. हार्दिक पंड्याचा जीटी संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातला या मोसमात अनुक्रमे मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध तीन सामने खेळायचे आहेत. त्यांनी यापैकी एक जरी सामना जिंकल्यास त्यांचे 18 गुण होतील आणि चेन्नई सुपर किंग्जशिवाय त्यांच्यापुढे कोणीही जाऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत हा संघ टॉप-2 मध्ये राहण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे, चेन्नई सीएसकेला लीग टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. चेन्नईने यातील एकही सामना जिंकल्यास त्यांचे 17 गुण होतील. अशा परिस्थितीत लखनौला सीएसकेशी बरोबरी साधण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील, तर मुंबईला त्यांना मागे टाकण्यासाठी तेच करावे लागेल.

IPL प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक

23 मे : क्वालिफायर 1 (चेन्नई)
24 मे : एलिमिनेटर (चेन्नई )
२6 मे : क्वालिफायर 2 (अहमदाबाद)
28 मे : फायनल (अहमदाबाद)

Back to top button