Ronaldo : फोर्ब्जच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोची बाजी; मेस्सी दुसर्‍या स्थानावर | पुढारी

Ronaldo : फोर्ब्जच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोची बाजी; मेस्सी दुसर्‍या स्थानावर

न्यू जर्सी; वृत्तसंस्था : अलीकडेच सौदी अरेबियाच्या अल-नासर संघाशी गलेलठ्ठ करार केल्यानंतर पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो फोर्ब्जच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी झेपावला आहे. या यादीत पॅरिस सेंट जर्मनीचे लियोनेल मेसी व किलियन एम्बापे अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी विराजमान आहेत. या कमाईत मैदानात व मैदानाबाहेरील उत्पन्नाचा विचार केला जातो. मैदानातील कमाईत सर्व प्रकारची बक्षीस रक्कम, वेतन व बोनस तर मैदानाबाहेरून मिळणार्‍या कमाईत स्पॉन्सरशिप डील, अपियरन्स फी, लायसन्स इन्कम व विविध व्यवसायांतून मिळणारा नफा याचा समावेश होतो. (Ronaldo)

गतवर्षी मँचेस्टर युनायटेड संघाशी फारकत घेतल्यानंतर रोनाल्डोने सौदी फुटबॉल संघाशी 2025 पर्यंतचा करार केला. रोनाल्डोने गतवर्षी 136 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली असून आता त्याची वार्षिक कमाई 75 दशलक्ष डॉलर्सने वाढली असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे. रोनाल्डोचा करार 200 दशलक्ष युरोपेक्षाही अधिक असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तवला गेला होता. (Ronaldo)

पॅरिस सेंट जर्मनीचा (पीएसजी) फॉरवर्ड, 35 वर्षीय लियोनेल मेसी 130 दशलक्ष डॉलर्स इतक्या कमाईसह या यादीत दुसर्‍या स्थानी विराजमान आहे तर त्याचा क्लब स्तरावरील संघसहकारी व फ—ेंच कर्णधार एम्बापे 120 दशलक्ष डॉलर्स कमाईसह तिसर्‍या स्थानी राहिला आहे. पीएसजी संघाची मालकी कतार स्पोर्टस् इन्व्हेस्टमेंट्सकडे आहे.

सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या या यादीत लॉस एंजिल्स लेकर्सचा खेळाडू व महान एनबीएपटू लेब—ॉन जेम्स (119.5 दशलक्ष डॉलर्स) व मेक्सिकन मुष्टियोद्धा कॅनेलो अ‍ॅल्वारेझ (110 दशलक्ष डॉलर्स) यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. अमेरिकेत स्थित पीजीए टूरच्या अव्वल गोल्फपटूंना गतवर्षी लिव्ह गोल्फच्या माध्यमातून उत्तम कमाई करता आली होती. त्याचेही या यादीत पडसाद उमटले असून पहिल्या 10 मध्ये 2 गोल्फपटूंना यात स्थान लाभले आहे.

माजी अव्वल मानांकित डस्टीन जॉन्सन 107 दशलक्ष डॉलर्स इतक्या कमाईसह सहाव्या स्थानी राहिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2022 मधील यादीत त्याचा पहिल्या 50 मध्ये देखील समावेश नव्हता. सहकारी लिव्ह गोल्फर फिल मिकल्सन 106 दशलक्ष डॉलर्ससह सातव्या स्थानी आहे. चारवेळचा एनबीए चॅम्पियन स्टीफन करी (100.4 दशलक्ष डॉलर्स) व फिनिक्स सन्सचा केव्हिन ड्युरँट (89.1 दशलक्ष डॉलर्स) या दोन बास्केट बॉलपटूंचाही पहिल्या दहामध्ये समावेश आहे. पहिल्या 10 मध्ये रॉजर फेडरर 95.1 दशलक्ष डॉलर्स कमाईसह या यादीत स्थान प्राप्त करणारा एकमेव निवृत्त खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा;

Back to top button