DC vs GT : तळातील दिल्लीने टॉपवरील गुजरातला हरवले | पुढारी

DC vs GT : तळातील दिल्लीने टॉपवरील गुजरातला हरवले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जिंकता जिंकता हरणारी दिल्ली मंगळवारी हरता हरता जिंकली. तळातील दिल्ली कॅपिटल्स संघाने टेबल टॉपर गुजरात टायटन्सला पराभवाचा झटका दिला. दिल्लीला 130 धावांत रोखल्यानंतरही गुजरातच्या तगड्या फलंदाजीला हे आव्हान गाठता आले नाही. अनुभवी इशांत शर्माने शेवटच्या षटकांत 12 धावांचा यशस्वी बचाव केला. त्याने फक्त 6 धावा दिल्याने दिल्लीला 5 धावांनी विजय मिळाला.

गुजरातला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 33 धावांचे आव्हान होते. दिल्लीच्या मंद खेळपट्टीवर हे आव्हान तसे कठीण होते. त्यात एन्रिक नोर्त्जेने पहिल्या तीन चेंडूत 3 धावा दिल्या. त्यामुळे 9 चेंडूत 30 धावांचे आव्हान उरले; पण यानंतर स्ट्राईकवर आलेल्या राहुल तेवतियाने सलग तीन षटकार ठोकून टार्गेट फक्त 12 धावांवर आणले. त्यामुळे दिल्लीच्या पदरी आणखी एक पराभव येणार की काय, असे वाटू लागले.

शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी अनुभवी इशांत शर्मावर होती, त्याने आपला सर्व अनुभव पणाला लावून 3 चेंडूत 3 धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर तेवतियाला बाद करून गुजरातच्या अडचणी वाढवल्या. फलंदाजीस आलेल्या राशिद खानपुढे दोन चेंडूत 9 धावा करण्याचे आव्हान होते. पण इशांतने टिच्चून मारा करताना फक्त तीनच धावा दिल्याने दिल्लीने विजय साजरा केला. हार्दिक पंड्या 59 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुणतालिकेतील तळात असलेल्या दिल्लीचा उरला सुरला आत्मविश्वास मोहम्मद शमीने घालवून टाकला. गुजरातने दिल्लीला पहिल्या 5 षटकांत 5 धक्के दिले. यातील 4 विकेटस् एकट्या मोहम्मद शमीने घेतल्या. शमीने सॉल्टला पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद केले.

त्यानंतर रिले रूसोला 8 तर मनीष पांडेला 1 धावेवर बाद केले. पाठोपाठ पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियम गर्गला 10 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली. शमीने दिल्लीची अवस्था 5 षटकात 5 बाद 23 धावा अशी केली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावा करून धावबाद झाला. मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी केल्यानंतर अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. ही जमलेली जोडी शतकी मजल मारणार असे वाटत असतानाच मोहित शर्माने 30 चेंडूत 27 धावा करणार्‍या अक्षर पटेलला बाद केले.

अक्षर बाद झाल्यानंतर अमनने डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. त्याला रिपल पटेलने आक्रमक साथ दिली. दरम्यान, अमनने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर (51) राशिद खानने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला 126 धावांवर 7 वा धक्का दिला. यानंतर डावाच्या शेवटच्या षटकात मोहित शर्माने रिपल पटेलला 23 धावांवर बाद करत आपली 100 वी आयपीएल विकेट देखील साजरी केली.

हेही वाचा;

Back to top button