Manchester City : एकतर्फी विजयासह मँचेस्टर सिटी ‘टॉपर’ | पुढारी

Manchester City : एकतर्फी विजयासह मँचेस्टर सिटी ‘टॉपर’

फुलहॅम; वृत्तसंस्था : मँचेस्टर सिटीने साखळी फेरीत घरच्या मैदानावर खेळणार्‍या फुलहॅमला 2-1 अशा फरकाने नमवत फेब—ुवारीनंतर प्रथमच प्रीमियर लीग स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले. इर्लिंग हालँडने या सामन्यात केवळ 3 मिनिटांत खाते उघडत विक्रमी 34 वा प्रीमियर लीग गोल नोंदवला. नॉर्वेच्या या दिग्गज खेळाडूने पेनल्टीवर संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलसह त्याने एकाच प्रीमियर लीग हंगामात अ‍ॅलन शियरर व अँडी कोल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. (Manchester City)

इंग्लंडमध्ये एकाच हंगामात सर्व प्रकारात 50 गोल करणारा तो टॉम वेरिंगनंतर पहिला खेळाडू ठरला. टॉम वेरिंगने 1931 मध्ये अ‍ॅस्टॉन व्हिलातर्फे हा विक्रम केला होता. मँचेस्टर सिटीचा संघ आता 76 गुणांवर असून अर्सेनलपेक्षा एका गुणाने आघाडीवर आहे. मँचेस्टर सिटीचा अर्सेनलच्या तुलनेत आणखी एक सामना बाकी आहे. फुलहॅमचा संघ या लढतीनंतर दहाव्या स्थानी कायम राहिला आहे. (Manchester City)

दुखापतीमुळे बाहेर असलेल्या केव्हिन डे ब्रुएनच्या गैरहजेरीत सिटीचा संघ फार काळ आघाडी कायम राखू शकला नाही. व्हिनिसियसने एडर्सनला चकवत यजमान संघाला बरोबरीत आणले. दुसर्‍या सत्रात मिडफिल्डर आंद्रियास परेराला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्याने फुलहॅमला आणखी एक धक्का बसला. पण, नंतर रियाद महरेझने दिलेल्या पासवर अल्वारेझने अचूक गोल केला आणि सिटीने 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली.

मँचेस्टर युनायटेडची व्हिलाविरुद्ध निसटती बाजी

आणखी एका सामन्यात ब्रुनो फर्नांडेसने मँचेस्टर युनायटेडला अ‍ॅस्टॉन व्हिलाविरुद्ध 1-0 अशा फरकाने महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. या विजयासह प्रीमियर लीगमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान कायम राखण्याची त्यांची अपेक्षा उंचावली आहे. इरिक टेन हॅगचा हा संघ 32 सामन्यांत 63 गुणांसह चौथ्या स्थानी असून त्यांचा आणखी एक सामना बाकी आहे. पाचव्या स्थानावरील टॉटनहम हॉटस्पर 54 गुणांवर आहे. युनायटेडचा संघ घरच्या मैदानावर प्रीमियर लीग स्पर्धेत 15 सामन्यांमध्ये अपराजित आहे. त्यांनी या 15 सामन्यात केवळ 3 सामने बरोबरीत रोखले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

हंगामातील पहिल्या आठवड्यानंतर ओल्ड ट्रॅफोर्डवर त्यांना एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. प्रारंभी या मैदानावर त्यांना ब्रिटॉनविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. स्पर्धेतील अन्य लढतीत कॅलम विल्सनच्या दुहेरी गोलच्या बळावर न्यू कॅसल युनायटेडने साऊथम्प्टनला 3-1 अशा फरकाने तर जेफर्सन लेर्माच्या अशाच पराक्रमामुळे बाऊर्नमाऊथने लीड्स युनायटेडला 4-1 अशा फरकाने पराभूत केले.

लिव्हरपूलचा टॉटेनहमविरुद्ध रोमांचक विजय

दिएगो जोटाने स्टॉपेज टाईममध्ये महत्त्वपूर्ण गोल केल्यानंतर लिव्हरपूलने टॉटेनहम हॉटस्परविरुद्ध 4-3 असा निसटता विजय संपादन केला. पोर्तुगीज सबस्टिट्यूट जोटाने जादा वेळेत चौथ्या मिनिटाला गोल केला आणि हाच गोल या सामन्यात निर्णायक ठरला. लिव्हरपूलतर्फे त्यापूर्वी कर्टिस जोन्स, लुईस दियाझ, मोहम्मद सलाह यांनी केवळ पहिल्या 15 मिनिटातच 3-0 अशा फरकाने आघाडी प्राप्त करून दिली. त्यानंतर टॉटनहमने हॅरी केन, सन हेयूंग-मिन, रिचार्लीसन यांनी प्रत्येकी एक गोल केल्यानंतर बरोबरी प्राप्त केली होती.

हेही वाचा;

Back to top button