MS Dhoni Video : चेन्नईमध्ये धोनीने सलग दोन षटकार ठोकून केला खास विक्रम | पुढारी

MS Dhoni Video : चेन्नईमध्ये धोनीने सलग दोन षटकार ठोकून केला खास विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा सामना संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी अनेक अर्थांनी खास होता. धोनीने या सामन्यात केवळ तीन चेंडूंचा सामना करताना दोन षटकार मारत १२ धावा केल्या आणि आयपीएलमधील ५ हजार धावाही पूर्ण केल्या.

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सोमवारी चेन्नईने लखनौ सुपरजायंटस्ला १२ धावांनी हरवून हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजीला आला. धोनीने तीन चेंडूंचा सामना केला. त्याने पहिल्या दोन चेंडूंत दोन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर मार्क वूडने त्याला आयुष बडोनीकरवी झेलबाद केले. धोनीने या सामन्यात १२ धावा करण्यासोबतच आपल्या पाच हजार धावांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा करणारा धोनी सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी ही कामगिरी केली आहे.

चेन्नई एक्स्प्रेस विजयी स्टेशनवर

चार वर्षानंतर होमग्राऊंडवर खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. चेन्नईने लखनौ सुपरजायंटस्ला १२ धावांनी हरवून विजय पटकावला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या लखनौच्या नवाबांची गाडी २०५ धावांवर अडकली. सलग दुसरे अर्धशतक करणारा ऋतुराज गायकवाड आणि चार विकेट घेणारा मोईन अली चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. चेन्नईच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंटस्चीही सुरुवात दमदार झाली. कायले मेयर्स आणि कर्णधार केएल राहुल यांनी वेगाने धावा केल्या. लखनौकडून मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

हेही वाचा : 

Back to top button