ऑस्ट्रेलियन बोर्डाची महिला क्रिकेटपटूंना भरघोस पगारवाढ | पुढारी

ऑस्ट्रेलियन बोर्डाची महिला क्रिकेटपटूंना भरघोस पगारवाढ

सिडनी, वृत्तसंस्था : बीसीसीआय आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही महिला क्रिकेटची रचना सुधारण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणजेच सीए यांच्यात पुढील 5 वर्षांसाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

महिला क्रिकेटपटूंच्या पगारात सुमारे 66 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याच कालावधीसाठी सीएच्या केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या पुरुष क्रिकेटपटूंच्या पगारात सुमारे 9.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, सीएसोबत करारबद्ध झालेल्या पुरुष क्रिकेटपटूंची संख्या 20 वरून 24 झाली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंच्या संघटना यांच्यातील करारानुसार, महिला बिग बॅश लीगमध्ये देखील एक करार असलेल्या सर्वोच्च पगाराच्या ब्रॅकेटमधील खेळाडू आता एका वर्षात 1 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (5.5 कोटी रुपये) कमवू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंग यात येते. आता लॅनिंगला एका वर्षात 5.5 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

हार्दिक पंड्यापेक्षा लॅनिंगला जास्त पगार

अलीकडेच बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवीन कराराची यादीही जारी केली आहे. या यादीतील ग्रेड-अ मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून 5 कोटी रुपये मिळतील. या यादीत हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि आर. अश्विन यांचा समावेश आहे. म्हणजे मेग लॅनिंगला या 5 भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.

लॅनिंग व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या शीर्ष 6 महिला क्रिकेटपटूदेखील दरवर्षी सरासरी 5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (रु. 2.7 कोटी) कमावतील. ही रक्कम बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टच्या ग्रेड-सीमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय खेळाडूंना मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त आहे.

बीसीसीआय ग्रेड-सीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरवर्षी एक कोटी रुपये देणार आहे. शिखर धवन, उमेश यादव, शार्दूल ठाकूर या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या टॉप महिला क्रिकेटपटू एका वर्षात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंपेक्षा जास्त कमाई करतील. निदान पगाराच्या बाबतीत तरी असे होईल.

 

Back to top button